फोटो सौजन्य- सोशल मीडिया
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागलेल्या बडनेरा मतदारसंघात रणी राणा यांनी मोठा विजय मिळवला आहे. 60 हजाराहून जास्त मताधिक्क्य त्यांनी मिळवले असून त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि प्रहार जनशक्ती पक्षांच्या उमेदवारांवर मात केली आहे. राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून सुनील खराटे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रिती बंड निवडणुकीच्या रिंगणात होते.
रवी राणा यांनी बडनेरातून सलग चौथ्यांदा विजय मिळवला आहे. 2009 पासून रवी राणा हे या मतदारसंघातून विजयी होत आहेत. 2019 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव केला होता. या सलग चौथ्या विजयासहित त्यांनी आपली मतदारसंघावर आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. रवी राणा यांचा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीमधील घटक पक्ष आहे. त्यामुळे ते सत्तेमध्ये असणार आहेत.
लोकसभेत झाला होता नवनीत राणांचा पराभव
लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती मतदारसंघातून रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांना कॉंग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी 19 हजार 731 मताधिक्क्याने पराभूत केले होते.
बच्चू कडू यांचा पराभव
रवी राणा यांचे अमरावती जिल्ह्यातील कट्टर विरोधक बच्चू कडू यांचा पराभव झाला. त्यावरुन हा लोकसभा निवडणूकीचा बदला आहे अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे. तिसऱ्या आघाडीच्या सरकारसाठी प्रयत्न करत असलेल्या बच्चू कडू यांना जोरदार धक्का बसला आहे. अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील या लढतीमध्ये विद्यमान आमदार बच्चू कडू यांचा भाजप उमेदवार प्रवीण तायडे यांनी 12 हजारहून अधिक मताधिक्क्याने पराभव केला आहे. 2004 पासून बच्चू कडू हे सलग 4 वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते मात्र यावेळी त्यांना जनतेने नाकारले आहे.
महायुतीचा झंझावात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार राज्यात महायुतीचा झंझावात पाहायला मिळत आहे.महायुतीला तब्बल 227 जागा मिळाल्या आहेत. 127 जागांवर आघाडी मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपचे हे यश 2014 पेक्षाही मोठे ठरले आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने तब्बल 57 जागा आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने 39 आघाडी मिळवली आहे.
महाविकास आघाडीचा सपशेल पराभव
महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाल्याचे पाहायला मिळत असून ठाकरे गट, कॉंग्रेस आणि शरद पवार गट या महत्वाच्या पक्षांना केवळ 46 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यात कॉंग्रेसला 16 जागा, शिवसेना ठाकरे गट 21 जागांवर आघाडीवर आहे तर शरद पवार गट10 जागांवर आघाडीवर आहे. इतर घटक पक्षांना काही जागांवर आघाडी मिळाली आहे त्यांचा समावेश केल्यास मविआ 50 पर्यंत पोहचत आहे.