मुंबई : ‘अनुरागजी, आमची केडीएमसी (KDMC) फक्त सेटिंगमध्ये स्मार्ट आहे, मग ती टक्केवारीची (Percentage) असो की नवनवीन पुरस्काराची (Awards) असो.. बरं झालं आपण घरचा आहेर दिला’ असे मनसेचे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी ट्विट केले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी, त्यांनी भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते, व्यापाऱ्यांची भेट घेत समस्या जाणून घेतल्यात.
अनुराग ठाकूर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्तांसह पालिका अधिकाऱ्यांचे भेट घेत विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी, त्यांनी स्मार्ट सिटी येथील कंट्रोल रूमला भेट दिली. यादरम्यान, त्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत ही स्मार्ट सिटी आहे हे ऐकून हैराण झालो, असे पालिका आयुक्तांना सुनावले. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी खोचक ट्विट केले आहे. त्यांनी अनुराग ठाकूर यांच्या या प्रतिक्रियेनंतर अनुराग ठाकूरजी आमची केडीएमसी फक्त सेटिंग मध्ये स्मार्ट आहे, मग ती टक्केवारीचे असो की नवनवीन पुरस्कार असो, बरं झालं आपण घरचा आहेर दिला, असे खोचक ट्विट केले आहे.
“हे शहर स्मार्ट सिटीमध्ये आहे का ? हे ऐकून मी आश्चर्यचकीतच झालो,रस्ते पण खराब आहेत”… केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांचे आयुक्तांना खडे बोल..@ianuragthakur जी,आमची #KDMC फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्कार असो….बरं झाले आपणच घरचा आहेर दिला.
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) September 12, 2022
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, काही प्रकल्प अनेक वर्षापासून सुरु आहेत. दु:ख या बाबतीचे आहे. याबाबत जी पीडा अधिकारी-कर्मचारी वर्गाला झाली पाहिजे, ती त्यांना नाही. ज्या प्रकारे लोकप्रतिनिधीना या बैठकीत आपले मत मांडले, त्यानुसार कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे, असे मत अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. तसेच दोन महिन्यानंतर पुन्हा येऊन या सगळ्यांचा आढावा मी घेणार, त्यात किती प्रगती झाली हे पाहणार, असेही केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी सांगितले.