सोलापूर :राज्याच्या आरोग्य आयुक्तपदी तुकाराम मुंढे (Tukaram Munde)यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हयातील आरोग्य विभाग (Solapur ZP Health Department) खडबडून जागा झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी रात्री आरोग्य केंद्रांना भेटी देऊन डॉक्टर व कर्मचारी हजर राहतात का? याची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे.
आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी घेतली आहेत. पदभार घेतल्यानंतर लगेच त्यांनी ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार सोयी मिळतात की नाही याची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव व शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढे ले यांनी वडाळा, नान्नज, वैराग कोंडी येथील आरोग्य केंद्रांना मध्यरात्री भेटी देऊन आरोग्य यंत्रणा सतर्क आहे की नाही याची खातरजमा केली आहे . रुणालयात दाखल असलेल्या रुग्णांची चौकशी करून गैरसोयीबाबत तक्रारी जाणून घेतल्या आहेत.
आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोलापुरात जिल्हाधिकारी म्हणून यापूर्वी काम पाहिले आहे. त्यामुळे ग्रामीण व सोलापूर शहर आरोग्य सेवेकडे त्यांचे लक्ष आहे. जिल्हा
आरोग्य विभागात मुख्यालयात ठाण मांडलेल्याची संख्या मोठी आहे. कोरोनाकाळात या कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेकडे पाठ करून अधिकाऱ्यांची सोय करण्याकडे लक्ष दिले आहे.अशा कर्मचाऱ्यांनी आता मुंडे यांच्या कार्यपद्धतीची धास्ती घेतली आहे. जिल्हा परिषदेत ठाण मांडून आरोग्य सेवेपेक्षा इतर कामे करणाऱ्यांनी आता पळून जाण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. कामचुकार असे कर्मचारी आरोग्य आयुक्तांच्या रडारवर आले आहेत. ज्यांच्याकडे रुग्णसेवेची जबाबदारी आहे अशा कर्मचाऱ्यानी कोरोना काळात किती रुग्णसेवा केली? याची लवकरच झाडाझडती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कामचुकारांना धडकी…
जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक म्हणून लागलेले कर्मचारी रुग्णसेवेकडे न फिरकता कार्यालयात ठाण मांडण्यात धन्यता आहेत. आता अशा कर्मचाऱ्यांची परीक्षा होणार असून रुग्णसेवेत जे पात्र ठरणार नाहीत, अशाना घरचा रस्ता मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कामचुकारांना आत्ताच धडकी भरल्याची चर्चा आहे.