पाऊस ओसरताच आजारांचा फैलाव; 'या' तालुक्यात ताप, डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले
तासगाव : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने तासगाव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर ओसरताच आता आरोग्याच्या समस्या डोकावू लागल्या आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये ताप, डेंग्यू, मलेरिया, व्हायरल फिव्हर, सर्दी-खोकला, पोटदुखी व अतिसार अशा आजारांचे रुग्ण वाढू लागले आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि खासगी दवाखाने रुग्णांनी गच्च भरले आहेत. नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
उकळून थंड केलेले पाणीच प्या, पाणी साचू देऊ नका, डासप्रतिबंधक उपायांचा वापर करा आणि लक्षणे दिसताच त्वरित दवाखान्यात जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. येत्या काही दिवसांत आजारांचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना अतिरिक्त औषधसाठा आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आठवड्यात शंभरहून अधिक तापाचे रुग्ण
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पावसामुळे साचलेले पाणी, उघडी गटारे, अस्वच्छता व डासांचे वाढलेले प्रमाण या कारणांमुळे आजारांचा प्रसार वेगाने होत आहे. गेल्या आठवड्यातच तालुक्यात शंभरहून अधिक तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी काहींना डेंग्यूची लक्षणे दिसून येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
नागरिकांसाठी विशेष सूचना
पावसाळ्यामध्ये वातावरणातील बदलांमुळे होणारे सर्दी, खोकला, व्हायरल फीवर यांसारखे आजार, दूषित पाण्यामुळे होणारे अतिसार सारखे आजार व कीटकजन्य आजार यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभाग सतर्क असून आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत नियमित सर्वेक्षण चालू आहे. कोणी आजारी असल्यास त्वरित नजीकच्या सरकारी दवाखान्यामध्ये संपर्क साधावा.
– विशाल कारंडे, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती तासगाव