amol kolhe target ajit pawar
गोंदिया : राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते प्रचाराला लागले आहेत. लोकसभा निवडणूकीप्रमाणे विधानसभा निवडणूकीमध्ये देखील अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी जोरदार लढत दिसणार आहे. अजित पवार गटाकडून जनसन्मान यात्रा काढण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा ही भंडारा-गोंदिया जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे. यावेळी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. ‘येऊ नको म्हटलं तरी कोणत्या गाडीत बसू अशी अजित पवारांची अवस्था असल्याची टीका करत त्यांना डिवचण्यात आलं आहे.
शिवस्वराज्य यात्रेमध्ये शरद पवार गटाचे स्टार प्रचारक आणि खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. गोंदियामध्ये यात्रा असताना अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उपस्थितांसमोर भाषण करताना अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र डागलं. अजित पवार यांनी भाजप नेते व केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे बिहार पॅटर्न प्रमाणे मला मुख्यमंत्री करा अशी मागणी केल्याचे वृत्त इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केलं आहे. त्यावरुन आता अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली.
📍तुमसर (भंडारा)
सभागृह तुडुंब भरून सभागृहाच्या बाहेरही झालेली स्वाभिमानी शिलेदारांची गर्दी पाहता यंदा तुमसर विधानसभा मतदारसंघातील तुतारीची ललकारी भल्याभल्यांच्या उरात धडकी भरवणार याची खात्री झाली. pic.twitter.com/Zjrdl8jQY9
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 10, 2024
काय म्हणाले अमोल कोल्हे?
प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता अमोल कोल्हे यांनी त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये येत राजकीय टीका केली. अमोल कोल्हे म्हणाले की, “शिवस्वराज यात्रा ही स्वाभिमानासाठी काढलेली यात्रा आहे. मी प्रफुल्ल पटेल यांच्यावर बोलणे एवढा मोठा नेता मी नाही. ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत. प्रफुल्ल पटेल साहेब, आपसे तो ये उम्मीद न थी,” अशी खंत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. तसेच “गोंदिया व भंडारामध्ये भेल प्रकल्प आणि विमानतळ प्रकरण असो, याबाबत जनतेने पाहिलं आहे. म्हणूनच दोन्ही जिल्ह्यातील लोकांना पवारसाहेबांवर विश्वास आहे आणि त्यानुसार जयंत पाटील जागेचं ठरवतील,” असे मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
भाषणावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची मागणी भाजप पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. यावर अमोल कोल्हे म्हणाले की, “येऊ नको म्हटलं तरी कोणत्या गाडीत बसू अशी अवस्था अजित पवार गटाची झाली आहे. महायुतीच्या सर्व्हेमध्ये अजित पवारांना फक्त 12 जागा मिळतील, मग बाकीच्या 28 आमदारांचे काय करायचे हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर असल्याने दादांनी बिहार पॅटर्ननुसार मुख्यमंत्रीपदाची मागणी केली असेल,” असा टोला शरद पवार गटाचे नेते व खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.