बीडच्या वाण नदीला पूर; पुरात दोघांसह रिक्षा गेली वाहून, एकाचा मृतदेहच सापडला अन् दुसऱ्याचा...
बीड : किल्ले धारूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाने तालुक्यातील वाण नदीला पूर आला होता. किल्ले धारुर आडस-अंबाजोगाई रस्त्यावरील अवरगावजवळ रिक्षा वाहून गेला असून, तर अंजनडोहजवळ चारचाकी वाहन गेल्याची घटना घडली आहे. यातील अंजनडोह जवळील वाहून गेलेल्या नितीन कांबळे यांचा मृतदेह बीड येथील अग्निशामक दलास सापडला आहे तर रिक्षा चालकाचा शोध सुरू आहे.
वाण नदीला पूर आला की, सतत पुलावरुन पाणी वाहून हा रस्ता बंद पडतो. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या पुलांची उंची वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. धारूर तालुक्यातील अंजनडोह येथील आडत व्यापारी नितीन शिवाजीराव कांबळे (वय ४२) हे रुई धारूर येथून अंजनडोहकडे चारचाकी वाहनातून येत असताना वाण नदीला पूर आलेला होता. पुलावरून पाणी वाहत होतं, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नितीन कांबळे हे गाडीसह वाहून गेल्याची घटना रात्री घडली आहे.
दरम्यान, रात्रीपासून त्यांचा शोध सुरू होता. गुरुवारी (दि. २८) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुलापासून काही अंतरावर मृतदेह आढळून आला. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी धारुर येथील सरकारी दवाखान्यात हलविण्यात आला आहे.
रिक्षाचालक लोखंडेंचा शोध सुरू
दरम्यान, रात्रीपासून ग्रामस्थ शोध घेत आहेत. सकाळी रिक्षा नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली. परंतु रिक्षा चालक अद्याप सापडला नसून तहसीलदार श्रीकांत निळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्यासह प्रशासन घटनास्थळी तळ ठोकून राहिले. धारुर आडस अंबाजोगाई मार्गावर अवरगावजवळ पुलावरुन यापूर्वीही एक चारचाकी वाहून गेली होती. परंतु ती घटना दिवसा घडल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदत करत त्या कारमधील चौघांना सुरक्षित चाहेर काढल्याने मोठा अनर्थ टाळला होता.
तांदळवाडी तलाव झाला ओव्हरफ्लो
केज तालुक्यातून ही वाण नदी वाहत तांदळवाडी, आवरगाव, अंजनडोह, आसरडोह, मोरफळी अशी वाहत ती अंबाजोगाई तालुक्यात जाते. मागील जोरदार पावसामुळे आवरगावच्या वरील तांदळवाडी येथील तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पाणी सरळ नदी पात्रातून वाहू लागल्याने मोठा पूर आला.