
फोटो सौजन्य: Gemini
गौण खनिज व वाळूच्या अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल विभागाचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकात पळशी येथील मंडळ अधिकारी अशोक भाऊसाहेब डोळस (वय 57) यांच्यासह एस. आर. काळे (ग्राम महसूल अधिकारी, लोणी हवेली), आर. आर. खरमाळे (राधा), ए. डी. जगताप (चांभूत), एस. सी. पवार (सिद्धेश्वरवाडी) आणि एन. के. पवार (पळशी) यांचा समावेश आहे.
हे पथक 25 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजता देसवडे परिसरात पेट्रोलिंग करत असताना, पावणेबाराच्या सुमारास देसवडे येथील मुळा नदीपात्राजवळ खंडोबा मंदिरालगत वाळूने भरलेला एक डंपर आढळून आला. पथक जवळ येताच दोन संशयित व्यक्ती झाडीत पळून गेल्या. त्याच वेळी तेथे एक पांढऱ्या रंगाची क्रेटा कार (MH 14 GH 9277) आली. कारमधून उतरलेली व्यक्ती विशाल तळेकर असल्याचे मंडळ अधिकारी डोळस यांनी ओळखले.
पथकाने पंचनामा करून डंपर व कार ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, तळेकर याने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. पोलिसांना बोलावल्याचे सांगताच त्याने डंपर सुरू केला. पथकातील संकेत चंद्रकांत पवार यांनी डंपर थांबवण्यासाठी चालकाच्या बाजूच्या सीटवर बसण्याचा प्रयत्न केला, याचा राग आल्याने तळेकरने “तुम्हा एकेकाला गाडीखाली चिरडून मारतो” अशी धमकी देत डंपर थेट कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आणि पवार यांना घेऊन तो सुसाट पळून गेला.
पथकाने पवार यांचा शोध घेतला असता, घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर पोखरी गावाच्या शिवारात ते रस्त्यावर सापडले. तळेकरने त्यांचा मोबाईल जमिनीवर आपटून फोडला होता तसेच रस्त्यावर वाळू टाकून त्यांना धमकावत खाली उतरवले होते. दरम्यान, पथक घटनास्थळी परतले असता क्रेटा कार तेथेच उभी आढळली. पंचनामा करून ती कार ताब्यात घेण्यात आली.
मंडळ अधिकारी अशोक डोळस यांच्या फिर्यादीवरून विशाल तळेकर याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.