फोटो सौजन्य- सोशल मीडिया
महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीचा निकाल काही तासातच जाहीर केला जाणार आहे. त्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. राज्यात 288 विधानसभा जागांसाठी बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. मात्र एका मतदारसंघात पुन्हा मतदान करण्याची मगाणी केली जात आहे. नेमकी ही मागणी का केली जात आहे?
कोणत्या मतदारसंघात फेरमतदानाची मागणी?
संपुर्ण राज्याचे लक्ष असलेल्या बीडमधील परळीत फेरमतदानाची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी परळीतील 122 अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर फेरनिवडणुक व्हावी अशी मागणी केली आहे. या मतदारसंघात त्यांच्या पक्षाच्या नेत्याला मारहाण झाल्याचा निषेध त्यांनी केला
पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे, निवडणूक आयोगावर आरोप
पत्रकार परिषदेत राजेसाहेब देशमुख म्हणाले की, परळीतील 122 मतदान केंद्रावर अराजकता आणि दहशतीने बोगस मतदान झाले आहे. त्यामुळे या केंद्रावर फेरमतदान घ्यावे. यासंबंधी लेखी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. राजेसाहेब देशमुख पुढे म्हणाले की,परळी विधानसभा मतदार संघात परळी शहर बॅंक कॉलनी, धर्मापुरी, जलालपुर या भागात बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप मी स्वत: घेतला होता. अशीच स्थिती मतदार संघातील 122 संवेदनशील मतदान केंद्रावर आहे. उच्च न्यायालयाने या 122 मतदान केंद्रांवर सीआरपीएफचा कडक बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशा सूचना दिल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. तेथे दहशत आणि गंडागर्दी करत बोगस मतदान केले गेले. त्यांनी हे बोगस मतदान धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविले असल्याचा आरोपही केला.या मतदारसंघात झालेल्या शरद पवार गटाचे अॅड. माधव जाधव यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचाही देशमुख यांनी निषेध केला.
परळी मतदारसंघ
परळी मतदारसंघ हा मुंडे कुटुंबियांचा गड राहिला आहे. पंकजा मुंडे या मतदारसंघातून 2009 ते 2019 या कालावधीत आमदार होत्या. 2019 मध्ये धनंजय मुंडे यांनी पकंजा मुंडे यांचा पराभव करत या जागेवर विजय मिळवला होता. 2023 मध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीतून दोन्ही नेते एकत्र आले. या वर्षी पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांच्यासोबत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून पकंजा मुंडे यांना मताधिक्क्य मिळाले होते. दरम्यान विधानसभेसाठी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध शरद पवार गटाने राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.
विधानसभेसाठी काही तासांतच मतमोजणी
राज्याच्या विधानसभेकरिता होणाऱ्या मतमोजणीसाठी काही तास राहिले आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु होणार असून सामान्यत: सुरुवातील पोस्टल बॅलेटचे मतदान मोजले जाणार आहे. दुपारपर्यंत राज्यात महायुती की महाविकास आघाडी सत्तास्थापन करणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.