File Photo : Eknath Shinde
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान झालेले आहे. उद्या (दि.23) रोजी महाराष्ट्राचा महानिकाल हाती येणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून निकाल लागणार आहे. मतमोजणीसाठी सर्व प्रशासन तयार झाले आहे. निकालामुळे नेत्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. बुधवारी (दि.20) सर्व नेत्यांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही जोरदार गाजली. राज्यामध्ये झालेल्या बंडखोरीच्या राजकारणानंतर आणि राजकीय उलथा पालथीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत झाली असून पहिल्यांदाच हे पक्ष एकत्रित निवडणुकीला सामोरे गेले आहेत. शिंदे गटाचे नेते व प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
राज्यामध्ये अडीच वर्षापूर्वी झालेल्या बंडखोरीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार हे सूरत, गुवाहटीला गेले होते. यामुळे जोरदार टीका देखील करण्यात आली होती. एका वाहिनीच्या मुलाखतीमध्ये शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, आम्हाला उटी किंवा गुवाहाटी कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. आम्ही सगळे मुंबईतच जाऊन जीवाची मुंबई करू. आमदारांचा गटनेता निवडण्यासाठी सर्व आमदारांना एकत्र ठेवावे लागते. त्यासाठी आम्ही सगळे मुंबईत जाऊ आणि तिथेच सत्तास्थापनेचा दावा केला जाईल, असे विधान संजय शिरसाट यांनी केले आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका करताना, अदानी यांनी मणिपूरमध्ये रिसॉर्ट बांधले आहे. आम्ही संजय शिरसाट यांना तिथे पाठविणार आहोत. यावर उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, आम्हाला मणिपूरला घेऊन जाण्यापेक्षा संजय राऊत यांनी आम्हाला लंडनला घेऊन जावे. आम्हालाही लंडन फिरता येईल आणि आयुष्याचे सार्थक होईल. आम्हाला गुवाहाटी भाग 2करण्याची आवश्यकता नाही. आम्ही दुसरा एखादा प्रदेश पाहू, याची चिंता विरोधकांनी करू नये. भारत भ्रमण करण्याची आम्हाला हौस आहे. महायुतीची सत्ता आणण्याकडे आमचे लक्ष आहे.” असे विधान संजय शिरसाट यांनी केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संजय शिरसाट यांनी संजय राऊतांच्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलेल्या टीकेवर देखील निशाणा साधला. शिरसाट हा दलित समाजाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर यांची भूमिका चांगली आहे. सत्तेमध्ये राहून पक्षाचा विस्तार करता येतो. “संजय राऊत यांचे हे टोमणे हा त्यांचा (प्रकाश आंबेडकर) अपमान आहे. एखाद्या नेत्याचा अशाप्रकारे अपमान करणे गैर आहे. एकेकाळी त्यांचे पाय चेपायला हेच लोकं गेले होते. बाबासाहेबांच्या नातूचा अपमान हा संपूर्ण दलित समाजाचा अपमान आहे असे मी मानतो,” असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला आहे.