लाडक्या गणपतीबाप्पाचे आज घराघरात आगमन
मुंबई : राज्यभरातील सार्वजनिक मंडळांसोबतच घराघरात लाडक्या गणपती बाप्पाचे आज आगमन होत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषात गणरायाचे स्वागत करण्यासाठी सर्व जण आतूर आहेत. सार्वजनिक मंडळांच्या आगमन मिरवणुका सकाळपासूनच सुरू होतील. ढोल-ताशांच्या दणदणाटात एका लयीत सगळी वाद्ये वाजवत जल्लोषात बाप्पाची मिरवणूक निघणार आहे.
पुण्यासह मुंबईत अनेक ढोल ताशा पथके गणपतीमध्ये पारंपरिक वाद्ये वाजवत गणरायाला मानवंदना देण्यासाठी सज्ज आहेत. डीजे, स्पीकरच्या तालावर नाचणारे तरुण आणि त्यात लेझर लाईटचा होणारा धोकादायक वापर. यामुळे ढोल-ताशा पथकांचे पारंपरिक वाद्य वादन कौतुकाचा विषय ठरते. तरुणाई संस्कृतीच्या जवळ जात जुनी वाद्य शिकत आहेत. संबळ, ढोल, ताशांसोबतच लेझिम पथकेही मिरवणुकीत सहभागी होत असून, यात जवळपास ५० टक्के महिला आणि मुलींची संख्या राहणार आहे. यात विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, महिला, तरुण आणि तरुणी मोठ्या जोमाने सहभागी होणार आहेत.
श्रींच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त नेमका कधी?
पोलिसांचा राहणार तगडा बंदोबस्त
गणेशोत्सवात शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजा सांभाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष ‘सुपर प्लॅन’ आखला आहे. दहा दिवसांच्या सणात शहरात लाखो भक्तांची गर्दी होत असते. मंडपांवर होणाऱ्या कार्यक्रमांपासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत सर्वत्र पोलिसांची काटेकोर नजर राहणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पेट्रोलिंग
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब शोध पथक व श्वानपथक तैनात केले जाणार आहे. शहरात पेट्रोलिंग सुरू राहील. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गुन्हेगार तसेच संशयास्पद हालचालींवर विशेष नजर ठेवली जाणार आहे. सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.