पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या खूनप्रकरणात मोठी माहिती समोर आली असून, गोळ्या घालण्यापूर्वी दोघांनी “गोळीबाराचा” सराव केल्याचे समोर आले आहे. हा सराव मुळशी तालुक्यात करण्यात आल्याची माहिती या आरोपींनी दिली आहे. त्याबाबत आता पोलीस तपास करत आहेत.
पुन्हा शहरात टोळीयुद्ध भडकण्याची भीती
कुख्यात गँगस्टर शरद हिरामण मोहोळ (४०) याचा ५ जानेवारी रोजी भरदुपारी घरासमोर त्याच्याच सोबतीला असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला. या खुनानंतर शहरात आणि गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुन्हा शहरात टोळीयुद्ध भडकण्याची शक्यताही वर्तवली जाऊ लागली होती. परंतु, गुन्हे शाखेने केवळ ८ तासांत या कटात असलेल्या ६ जणांना आणि त्यांना मदत करत असल्याप्रकरणी दोन वकिलांना अटक केली.
अत्यंत नियोजनबद्धरित्या केला खून
प्राथमिक तपासात जमिनीचे वाद त्यातील आर्थिकीकरणं तसेच गेल्या १० वर्षापासूनचे वाद यातून झाल्याचे उघड केल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्र देखील ढवळून निघालं. एका कुख्यात गँगस्टरचा अश्या पद्धतीने गेम केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेली काही वर्षे गुन्हेगारीत दबदबा निर्माण करणाऱ्या गँगस्टर अत्यंत नियोजन बद्ध खून केला गेल्याचे यावरून स्पष्ट झाले. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या २० वर्षाच्या मुलाची प्रमुख भूमिका यात दिसून आली आहे. त्यामुळे पोलिसांकडूनदेखील सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला आहे.
नाईन एम.एमची तीन पिस्तुलांचा वापर
दरम्यान गुन्हे शाखेने गोळ्या घालणारे मुन्ना पोळेकर व नामदेव कांनगुडे या मामा भाच्यासह 6 जणांना पकडले. आता या मुलांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यात ही माहिती समोर आली आहे. मुन्ना पोळेकर आणि नामदेव कांनगुडे यांनी खून करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केल्याचे दिसत असल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे. कारण, चार महिन्यांपूर्वी या मुलांनी नाईन एम.एमची तीन पिस्तुल खरेदी केली. तर पिस्तुल घेतल्यानंतर या दोघांनी मुळशी तालुक्यात पिस्तुल चालवण्याचा सराव देखील केला होता, असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे शरद मोहोळचा गेम करण्यासाठी मुलांनी पूर्ण प्लॅनिंग केल्याचे समोर आले आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
Web Title: Big update on sharad mohol murder case killers practiced pistol firing in mulshi read detailed report nryb