(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Vishal Dadlani :लोकप्रिय बॉलिवूड गायक आणि संगीतकार विशाल ददलानी त्यांच्या दमदार आवाजासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. गेल्या तीन दशकांपासून ते टक्कल लूकमध्ये दिसत आहेत. मात्र, त्यांनी हा लूक का स्वीकारला, यामागचं नेमकं कारण फार कमी लोकांना माहिती आहे. तरुणपणी लांबसडक केस असलेल्या विशाल यांनी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी डोक्याचे मुंडन करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांनी स्वतःच या लूकमागची रंजक कहाणी सांगितली आहे.
नुकतीच विशाल ददलानी यांनी नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या ‘डबल डेट’ या यूट्यूब शोमध्ये हजेरी लावली. यावेळी ५३ वर्षीय विशाल यांनी आपल्या टक्कल लूकमागील कारणासोबतच आयुष्यातील काही खास गोष्टींचाही खुलासा केला.
शोदरम्यान विशाल यांना त्यांच्या टक्कल लूकबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सांगितले की, वयाच्या २३ व्या वर्षापर्यंत त्यांचे केस लांब होते. यावेळी त्यांनी नेहा धुपियाला तरुणपणीचा स्वतःचा एक जुना फोटोही दाखवला.
विशाल यांनी सांगितले की, एकेकाळी ते अत्यंत धार्मिक होते. याच श्रद्धेपोटी वयाच्या २३ व्या वर्षी ते तिरुपतीला गेले होते. तिथे त्यांनी डोक्याचे मुंडन केले. त्याच दिवशी त्यांनी पुन्हा कधीही केस वाढवणार नाही, असा स्वतःशीच निर्धार केला. गेल्या अनेक वर्षांपासून ते या निर्णयाचे पालन करत आहेत.
Rani Chatterjee Chhath Puja: मुस्लिम असूनही दरवर्षी छठपूजा करते ही अभिनेत्री; नाव का आणि कसं बदललं?
विशाल ददलानी यांनी सांगितलेल्या या किस्स्यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या धार्मिक श्रद्धेमुळे त्यांनी केस काढले होते, त्या श्रद्धेत कालांतराने मोठा बदल झाला. धर्माबद्दलचा त्यांचा दृष्टिकोनही बदलला असून आज ते स्वतःला उघडपणे नास्तिक म्हणवतात.
२०१८ मध्ये ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर धर्माबद्दल आपले मत मांडताना त्यांनी लिहिले होते, “मी एक नास्तिक आहे, जो जन्माने हिंदू आहे आणि मी कोणत्या जातीचा आहे हे मला माहीतही नाही.”
विशाल ददलानी यांचा टक्कल लूक आज त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक खास भाग बनला आहे. मात्र, या लूकमागे कोणताही आजार किंवा फॅशन नसून तरुणपणी घेतलेला एक वैयक्तिक निर्णय असल्याचे त्यांच्या या खुलाशातून समोर आले आहे.






