
इंदापूर : भरधाव वेगातील पिकअपने दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ऐन दसऱ्याच्या दिवशी (दि.५) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी परिसरातील निमगाव केतकी व्याहळी रस्त्यावरील करवंदीचा मळ्या नजीक ही दुर्घटना घडली. पिकअप चालकाविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राहुल हनुमंत बनकर (वय ३० वर्षे, रा. निमगाव केतकी,लाईट बोर्डाचे पाठीमागे, बनकर मळा) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ओंकार चंद्रकांत गटकूळ (रा. निमगाव केतकी ता. इंदापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या पिकअप चालकाचे नाव आहे. या संदर्भात अंजुश्री शितलकुमार डोंगरे (रा. डोंगरे वस्ती, निमगाव केतकी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत राहुल बनकर हा फिर्यादी डोंगरे यांचा भाचा होता. काल रात्री सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपल्या पतीसह व्याहळी रस्त्याने निमगाव केतकीकडे निघाल्या होत्या. साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्या करवंदीचा मळा परिसरात आल्या. तेव्हा त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात निमगाव केतकीकडे निघालेल्या एक पांढर्या रंगाच्या पिकअपने (एम एच १३ आर ५९३६) फिर्यादीची दुचाकी ओलांडून जात, शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या दुचाकीला (क्र.एम एच.२४ टी २६४६) पाठीमागून धडक दिली. दुचाकीस्वाराला चिरडून ती पिकअप रस्त्याच्या उजव्या बाजूच्या खड्ड्यात जावून पलटी झाली.
[read_also content=”पाच लाखाची खंडणी मागितली; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/a-ransom-of-five-lakhs-was-demanded-a-case-has-been-registered-against-the-policeman-nrdm-333302.html”]
मयत दुचाकीस्वाराला पहाण्यासाठी जवळ गेल्यानंतर तो आपला भाचा असल्याचे लक्षात आले, असे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. पिकअप चालक त्याच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे करत आहेत.