
पालकमंत्र्यांना नाकारले, सोलापूर जिल्ह्याने भाजपला दिला दणका; मोहिते पाटलांची जादू कायम
पंढरपूरसारखी नामवंत नगरपरिषद भाजपाला गमवावी लागली आहे. स्थानिक विकास आघाडी, तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांनी बाजी मारली. शिवसेना शिंदे गट ३ ठिकाणी विजयी झाले. तर अकलूज आपल्या ताब्यात ठेवण्यात मोहिते पाटलांना यश आले. येथे दहशतीचा मुद्दा राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लावून धरला होता. त्याला जनतेने त्यांचा पराभव करून उत्तर दिलेले दिसत आहे.
भाजपात खदखद; पराभवाला जावे लागले सामोरे
संपूर्ण जिल्ह्यावर भाजपाची सत्ता आणण्यासाठी एक हाती कार्यक्रम राबविले होते. यामध्ये पालकमंत्री गोरे यांना पावर दिली होती. पण त्यांनी एकाधिकारशाही दाखवत स्थानिक नेतृत्वांना विश्वासात न घेता आपले निर्णय लादले. त्यामुळे भाजपात खदखद निर्माण झाली आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. एकूणच जिल्ह्यात प्रचार करत असताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निधी अडवण्याचे कटकारस्थान केले. स्थानिक राजकारणात ढवळाढवळ करत स्थानिक नेतृत्वांना नाकारत आपलेच निर्णय त्यांच्यावर लादले. त्यामुळे भाजपाला सपशेल अपयश मिळालेले दिसत आहे.
पंढरपूर सारखी महत्त्वाची नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी लक्ष घालून होते. तिथे निर्णय अधिकार माजी आमदार प्रशांत परिचारक यांनाच मिळायला हवे होते पण तसे न होता पालकमंत्री गोरे यांनीच सर्व सूत्रे हातात घेतल्यामुळे चांगले असणारे वातावरण पूर्णतः बिघडून गेले आणि हातची नगरपरिषद भाजपाला गमवावी लागली. सांगोलामध्ये देखील महायुतीतील घटक असणाऱ्या शहाजीबापू पाटलांना एकाकी पाडण्याचा प्रयोग पालकमंत्र्यांनी केला. त्यामुळे जनतेने पालकमंत्र्यांना पराभव करून त्यांची जागा दाखवून दिली. तिथेही भाजपाची सत्ता येऊ शकली असती. अकलूजमध्ये भाजपाने माजी आमदार राम सातपुते यांना पावर दिली आणि त्यांनी पालकमंत्र्यांना आणून अनेक सभा ठोकल्या आणि त्यातून दहशत गुंडागर्दी असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला होता. यालाही जनतेने पराभव करून ठोस उत्तर दिले.
हक्काची नगरपरिषद गमवावी लागली
भाजपाचे जे चार उमेदवार निवडून आलेले आहेत, ते त्यांच्या वैयक्तिक पातळीवर आलेले दिसतात त्यांच्या विजयामध्ये सातपुते यांचा कणभरही वाटा दिसत नाही. त्यामुळे अकलूज नगरपरिषद राजकीय नेतृत्व बदलून भाजपाला आपल्या ताब्यात ठेवणे सहज शक्य झाले असते. पण पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांनी घोळ केला आणि भाजपाला आपल्या सहजपणे ताब्यात येईल, अशी हक्काची असणारी नगरपरिषद गमवावी लागली.
अक्कलकोट, मैंदर्गी, बार्शी, अनगर या ठिकाणी भाजपाची सत्ता आली असली तरी त्यामध्ये पालकमंत्र्याचे योगदान नाही हे स्पष्टपणे दिसते. स्थानिक पातळीवरील नेते मंडळींच्या ताकदीमुळे या नगरपरिषद निवडणुकीत विजय मिळलेला दिसतो आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडी, स्थानिक विकास आघाडी यांना ताकद देण्याचा प्रयत्न धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. त्यामुळे भाजपाची पळता भुई थोडी झाली. पालकमंत्र्याविषयी असंतोषाची लाट होतीच त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अचूक ताकद देत विजयाला गवसणी घालण्यास मदत केली, त्यामुळे मंगळवेढा करमाळा पंढरपूर जिंकण्यात यश मिळाले आणि भाजपाला या नगरपरिषदा गमवाव्या लागल्या.
दुधनी, सांगोला, मोहोळ यामध्ये शिवसेना शिंदे गटाचा चमत्कार पाहायला मिळाला तोही भाजपाच्या असंतोषातूनच पालकमंत्र्यांच्या ब्लॅकमेलिंग धोरणाला कंटाळलेल्या जनतेने शिंदे गटाच्या पदरात दुधनी, सांगोला, मोहोळ टाकले. कुर्डूवाडी शिवसेना ठाकरे गटाचा विजय देखील भाजपा विषय असणाऱ्या तीव्र भावनेमुळेच साकार झाला.
एकूणच पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सपशेल अपयशी ठरलेले दिसत असून, बाहेरील नेतृत्वांना सोलापूर जिल्हा मान्यता देत नसल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्र्यांची वाढलेली लुडबुड आणि माळशिरस तालुक्याच्या राजकारणात सातपुतेंची वाढलेली एकाधिकारशाही लोकांना आवडलेली दिसत नाही. त्यामुळेच लोकांनी या बाहेरील नेतृत्वांना फटका करून पुन्हा एकदा जिल्ह्याचा स्वाभिमान दाखवून दिला आहे असेच या निकालाचे वर्णन आहे.