
अखेर सुरेश धस नरमले; प्राजक्ता माळीसंदर्भातील त्या वक्तव्यावर व्यक्त केली दिलगिरी
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीवर चुकीची विधाने केल्यामुळे वादंग उठलं होतं. भाजपचे बीडमधील आमदार सुरेश धस यांनीही बीडच्या गुन्हेगारीवर बोलताना प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर प्राजक्ताने कारवाई करण्याचा इशारा देत महिला आयोगाकडे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार केली होती. तरीही दुपारपर्यंत आपल्या मतावर ठाम असलेले धस नरमले असून एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे.
बीडमध्ये आज सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्राजक्ता माळी प्रकरणावर प्रश्न विचारला. त्यावर सुरेश धस म्हणाले, जे काही झालं, त्याला मी कोणत्याही परिस्थितीत सामोरं जायला तयार आहे. मला वाटतं, माझी बाजू अनेकांनी मांडली. संतोष देशमुख आणि बीडमधील जंगलराज या प्रकरणावरून लक्ष दुसरकडे वळवू नका. संतोष देशमुख प्रकरण आणि जिल्ह्यात माजलेली दादागिरी यावर बोला’, असं त्यांनी म्हटलं होत. त्यावरून ते आपल्या विधानावर ठाम असल्याचं दिसत होतं.
दरम्यान आज सायंकाळी त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, बीडच्या गुन्हेगारीवर माध्यमांशी बोलत होतो. मात्र माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. कोणाची अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता मात्र तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
परळीत अनेक गायरान जमिनींवर बेकायदा ताबा मिळवला आहे. विटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातं. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे आणलं जातं. जर कोणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचं असेल, त्यांनी परळीत यावे आणि याचा प्रसार देशभरात करावा, अशी खोचक टीका भाजप आमदार सुरेश धस यांनी केली होती.
“जर कोणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे.” सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सेलिब्रिटी परळीत येत असतात त्यांच्या तारखा कशा मिळविल्या जातात, याबाबतही सुरेश धस यांनी सांगितलं.
बीडमधील केज तालुक्याच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या हत्येच्या कटातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या गोरख धंद्याला चाप बसवावा या मागणीसाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली.यानंतर त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना, सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. परळीत राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झालं आहे. परळी पॅटर्नचाही उल्लेख करत त्यांनी सपना चौधरी, प्राजक्ता माळी आणि रश्मिका मंदाना यांचाही उल्लेख केला.