फोटो सौजन्य - Social Media
कर्जत शहरातून खालापूर तालुक्यातील लोधीवली येथील सेंट जोसेफ शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शाळेच्या बसमधील एका क्लीनरने तिघा चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात करण दीपक पाटील या स्कुल बस अटेंडंटला अटक करण्यात आली असून, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. यानंतर भारतीय जनता पक्ष कर्जत महिला मोर्चा आक्रमक झाला असून त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन कडक कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले.
भाजप महिला मोर्चा कर्जतच्या शहराध्यक्षा शर्वरी संतोष कांबळे यांच्या नेतृत्वात भाजप महिला कार्यकर्त्यांनी पोलीस उप अधीक्षक डीडी टेले आणि कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना निवेदन सादर केले. या निवेदनात आरोपीवर कठोर कलमे लावून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेच्या बसमध्ये महिला मदतनीस नेमणे बंधनकारक करावे, बस चालक व क्लीनर यांच्यासाठी आचारसंहिता तयार करून त्याचे काटेकोर पालन होईल यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असेही भाजपच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी भाजप तालुका महिला मोर्चा अध्यक्षा नम्रता कांदळगावकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी सांगितले की, “ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे आरोपीवर उग्र कारवाई होणे अत्यावश्यक आहे.” भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा शर्वरी कांबळे यांनीही स्पष्टपणे सांगितले की, “अशा विकृतीस अटकाव करण्यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे भविष्यात कोणालाही चिमुकल्यांवर अत्याचार करण्याची हिंमत होणार नाही.” त्याचबरोबर त्यांनी बस मालकांना महिला मदतनीस नेमण्याचे सक्तीचे आदेश देण्याची मागणीही केली.
या प्रसंगी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या कल्पना दास्ताने, पदाधिकारी अनुजा आफळे, जिल्हा उपाध्यक्षा स्नेहा गोगटे, राधा बहुतुले, श्रद्धा कराळे, वर्षा सुर्वे, स्मिता तीवाटणे, सुमन यादव आदी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या घटनेमुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने त्वरित कठोर पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.