वडगाव मावळ : मावळ विधानसभेला माजी मंत्री बाळा भेगडे यांनी बंडखोरी करण्याचे संकेत दिले आहेत. सांगली लोकसभेमुळे महाराष्ट्राच्या जनतेचे डोळे उघडले आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन पक्षाने निर्णय घेतला, तर काय होतं हे सांगलीकरांनी दाखवून दिलं. हा दाखला देत मावळ विधानसभेतही बंडखोरी होऊ शकते, याचे स्पष्ट संकेत बाळा भेगडेंनी दिल्याने महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात मावळ तालुका भाजपच्या वतीने शुक्रवारी कार्यकर्ता विजयी संकल्प मेळावा संपन्न झाला त्यावेळी बाळा भेगडे बोलत होते.
या संकल्प विजयी मेळाव्यास भाजप किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, विधानसभा निवडणूकप्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष दत्ता गुंड, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, कोअर कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती शेटे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, राजाराम शिंदे, शांताराम कदम, ज्येष्ठ नेते माऊली शिंदे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नितीन मराठे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली बोत्रे, शहराध्यक्ष संतोष भेगडे, अरुण लाड, संभाजी म्हाळसकर, अनंता कुडे, सुधाकर ढोरे लहू शेलार, मच्छिंद्र परंडवाल आदी उपस्थित होते.
बाळ भेगडे म्हणाले, मावळ मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. विद्यमान आमदारांनी लोकांना त्रास दिला असून, आता त्यांचा प्रचार करणार नाही. त्यामुळे ‘अभी नहीं तो कभी नहीं’ असा आमचा नारा असून, मावळात २०२४ ला भाजपचाच आमदार होईल, असा येट इशारा माजी राज्यमंत्री तथा भाजपचे नेते बाळा भेगडे यांनी दिला. विद्यमान आमदारांनी दिल्या घरी सुखी राहावे भाजपचे दरवाजे बंद आहेत, साडेचार वर्षात मावळात हुकूमशाही आहे, का लोकशाही, हेच कळले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे
दडपशाही नष्ट करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मावळची जागा भाजपला मिळायला हवी. जागा न मिळाल्यास राष्ट्रवादीचे काम करणार नाही व सांगली पॅटर्न राबविण्याचा इशारा त्यांनी दिला. तालुकाध्यक्ष भाऊ गुंड यांनी मावळची जागा भाजपला मिळावी. अन्यथा राष्ट्रवादीचे काम करणार नाही. आमदार सुनील शेळके यांना पक्षात प्रवेश देऊ नये, असा ठराव मांडला. ते एकमताने मंजूर करण्यात आला.