बुरा न मानो होली है, आता रंग उधळायचे की रोज...; अमोल कोल्हेंची कवितेतून सरकारवर सणसणीत टीका
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून संतोष देशमुख हत्या प्रकरण, अबू आझमींचं औरंगजेबावरील अबू आझमींचं विधान, पुणे स्वागरगेट बस स्थानक बलात्कार प्ररकरण आणि कायदा सुव्यवस्थेवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना खंडणी प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी होत आहे. तर माणिकराव कोकाटे यांच्याही राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या सर्व घडामोडी आणि राजकीय सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी आणि डोळ्यात अंजण घालणारी कविता सादर केली आहे. सरकार आणि एकंदर सर्वच परिस्थितीवर अमोल कोल्हेंनी चांगलंच सूनावलं आहे.
बुरा न मानो होली है…
काल विधान भवनाच्या पायऱ्यांवरून नितिमत्ता ओसंडून वाहिली
माणुसकी मात्र तोंड लपवून कोपऱ्यात हुंदके देत राहिली
जातीच्या मतांच्या लाचारीसाठी एवढे दिवस नैतिकतेच वस्त्रहरण होत होतं
विधानसभेच्या पावित्र्यावर मात्र गिधाडांच्या मयसभेचं सावट होतं
आवाज केला नाही तर बलात्कार कळत नाही, राज्याचे बाक कर्तुत्वाचे मंत्री सांगतात
पिचलेल्या शेतकऱ्यांचे कृषीमंत्री मात्र न्यायालयाचे निकाल सुद्धा महागड्या सुटात दडवून मिरवतात
रोज एक नवा बाण मुंबईतून ठाण्याचे दिशेने सुटत असतो
आयाळ कुरवळत घायाळ भायी हलक्यात न घेता हसत असतो
दिल्लीचा आशीर्वाद व्हाया ठाणे नागपूरच्या खुर्चीला टोचत असतो
बारामतीचा दादा मात्र गालात गुलाबी हसत असतो
देशमुख, सुर्यवंशी, वाकोडे फायली वरच्या माशा आता आता न्यायच हाकलतो बसतो
कारण कोरटकर, सोलापूरकर, आझमी आम्ही रोज नव्या चक्रव्यूहात फसत असतो
खरं तर लोकप्रीय योजनांच्या ओझ्याखाली अर्थव्यवस्था पुरती दबली आहे
मतं मिळवून झाली आता अपात्रतेची तलवार लाडक्या बहिणींवर सुद्धा टांगली आहे
कर्जमाफी वीजबीलमाफी, एसटी सवलत, सत्ता येताच सरकारचा गझनी झाला
मंत्र्यांचा ओएसडी सुद्धा आता सहाव्या मजल्याच्या टप्प्यात आला
अशा महाराष्ट्राकडे पाहून दिल्लीचं जॅकेट खदाखदा हसलं
म्हटलं १५०० अन् २१०० शे त खरेदी झाल्यावर आता तत्व कुठलं उरलं
विधानभवनाच्या प्रांगणात वाहणाऱ्या नैतिकतेचा एव्हाना चिखल झाला होता
चिखलात माखणाऱ्या पावलांबरोबर तो आजारपणाचा राजीनामा सुद्धा पडला होता
न्याय नैतिकता माणुसकी मात्र, अजूनही आशावादी होती
महाराष्ट्राच्या विधानसभेकडे बिचारी एकटक प्रश्नार्थक बघत होती
प्रश्न एकच होता, बुरा न मानो होली है म्हणत आता रंग उधळायचे
की रोज उधळले जाणारे रंग, थंड, षंडपणाने पहायचे