नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान
सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. त्यातच भाजपचे खासदार असलेले नारायण राणे यांच्या यांची खासदारकी धोक्यात आली आहे. कारण, त्यांच्या खासदारकीला ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी आव्हान दिले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नारायण राणे हे प्रतिनिधित्त्व करत आहेत. राणेंच्या निवडीला उच्च न्यायालयात निवडणूक याचिकेतून आव्हान दिले आहे. परंतु, या वादात आता भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) उडी घेतली असून, या कायदेशीर वादात अडकलेली ईव्हीएम मशीन सोडण्याची विनंती अर्जातून याचिकेत केली होती. ईसीआयची विनंती शुक्रवारी न्यायालयाने मान्य केली. या याचिकेमुळे 1944 बॅलेट युनिट्स आणि कंट्रोल युनिट्स सध्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अडकून पडले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन सोडवणे आवश्यक आहे, अशी विनंती ईसीआयच्या वतीने करण्यात आली होती. सध्याच्या निवडणूक याचिकेत ईव्हीएम मशीनचा वापर किंवा मतमोजणीचा समावेश नाही आणि त्यामुळे ईव्हीएम मशीन सीलबंद आणि निष्क्रिय स्थितीत ठेवणे आवश्यक नाही. त्यांचा वापर आगामी निवडणुकीत होऊ शकतो, असा दावाही ईसीआयच्या वतीने करण्यात आला.
7 मेला झाले होते लोकसभेसाठी मतदान
लोकसभेची रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी 7 मे रोजी निवडणूक पार पडली. या लढतीत राणे यांना ४,४८,५१४ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. तर राऊत यांचा ४७,८५८ मतांनी पराभव झाला. मात्र, निवडणुकीदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये राणे समर्थक मतदारांना पैसे वाटून राणेंना मतदान करण्यास सांगितले. या व्हिडिओच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करून राणे यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी राऊत यांनी केली.