राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज; मुंबईसह राज्यभरात पावसाची शक्यता
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसा कडक उन्ह तर सायंकाळनंतर थंडीची चाहूल दिसून येते. असे असताना आता भारतीय हवामान विभागाने मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) पावसाची आणि मेघगर्जनेसह पण हलक्या सरीची शक्यता वर्तवली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणीय स्थितीत सतत बदल होत असून, त्याचा हा परिणाम आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, त्यामुळे या आठवड्यात वातावरणात आर्द्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. सकाळपासून उन्ह पडलं असताना सायंकाळी पाचनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे पाहिला मिळाले. वातावरणात अस्वस्थता पसरली होती. पावसाच्या शक्यतेला पूरक हवामान स्थिती होती.
दरम्यान, मुंबईकरांना ऑक्टोबरच्या उकाड्याचा सामना करावा लागत असून, सोमवारी शहरात तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेले. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, कुलाबा वेधशाळेत सोमवारी कमाल तापमान ३५.० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जे सरासरीपेक्षा १.५ अंकांनी अधिक होते तर किमान तापमान २६.५ असून तेही कमी होत कमाल तापमान ३५.९ अंश नोंदवले गेले. किमान तापमान २५.१ अंश असून तेही १.२ अंकांनी जास्त होते.
रविवारपासून तापमानात घट
सप्टेंबरमधील जोरदार पावसानंतर राज्यात पुन्हा एकदा तापमानात बदल दिसून येऊ शकतो. सध्या मुंबईत ऑक्टोबर हीट जाणवत असून, उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारीपासून तापमानात घट होण्यास सुरुवात होईल.
सोमवारपासून पावसाची शक्यता
येत्या सोमवारपासून बुधवारी संध्याकाळपर्यंत मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आणि सणासुदीच्या काळात बाहेरील कार्यक्रमांचे नियोजन करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Rain Alert: राज्यातून मोसमी पावसाची माघार; मात्र ‘या’ठिकाणी पावसाची शक्यता
राज्यातील नैऋत्य मोसमी पाऊस ओडिशा आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागातून तसेच ईशान्य भारतातील उर्वरित भागातून माघारी परतला आहे. त्यामुळे राज्यात हवामानाचा कल हळूहळू कोरडेपणाकडे झुकत असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहिले.