पंढरपूर : नवनाथ खिलारे : राज्यामध्ये परतीच्या पावसाने तुफान हजेरी लावली आहे. दोन दिवस मुंबई, पुण्यासह काही जिल्हांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. धरण भागामध्ये जोरदार पाऊस कोसळल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रभागा नदी सध्या दुथडी भरून वाहू लागली असून जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. चंद्रभागा नदी पात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा विळखा असल्याने भाविकांना पाण्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
उजनी धरणातून तसेच वीर धरणातून नीरा व भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रभागेच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परंतू पंढरीत येणारा प्रत्येक भाविक हा प्रथम चंद्रभागेत स्नान करूनच विठ्ठल दर्शनाला जात असतो मात्र चंद्रभागेत पाण्याची पातळी वाढत असून सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. स्नानाबाबत प्रशासनाकडून स्पीकर वरून वारंवार सूचना देण्यात येत आहेत.
सध्या भीमा नदीमध्ये ९० हजार ३७०० क्यूसेकचा विसर्ग असून उजनी धरणातून ९० हजार क्यूसेकने पाण्याचा प्रवाह भीमा नदीमध्ये सोडण्यात आला आहे. तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये ३७०० क्यूसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नीरा नदीमधून पुढे भीमा नदीत हा प्रवाह मिसळत असल्याने चंद्रभागेला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. धरण क्षेत्र व पुणे भागामध्ये पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता नदीपात्रात पाण्याच्या विसर्गामध्ये आवश्यक तो बदल करण्यात येणार असून नदीपात्रामध्ये कोणीही उतरू नये प्रत्येकाने खबरदारी व दक्षता घ्यावी अशा सुचनाही देण्यात येत आहेत.
पंढरीत आलेला भाविक कशाचीही तमा न बाळगता चंद्रभागेच्या पात्रात स्नानाचा आनंद घेत असून दगडी पुलावरून पाणी सध्या वाहत असल्याने त्या ठिकाणाहून वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र तरीही जीवाची पर्वा न करता दुचाकीसह भाविक पुलावरून येजा करत असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाकडून सर्व ठिकाणी लक्ष ठेवण्यात येत आहे. सतत नागरिकांना पाण्यामध्ये न जाण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तसेच प्रशासनाने आत्तापासूनच नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली आहे. चंद्रभागेत पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने भाविकांनी आंघोळीसाठी पात्रात जाऊ नये किनाऱ्यावरूनच स्नान करावे अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन व लाईफ गार्ड, सुरक्षारक्षक यांच्याकडून देण्यात येत आहेत अशी माहिती पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
Web Title: Chandrabhaga river in pandharpur has flooded and devotees issued with alert notices solapur news