पिंपरी: आसमंत भगवामय… ढोल-ताशांचा गगनभेदी निनाद… मर्दानी खेळांचे थरारक सादरीकरण… अवधूत गांधींच्या सुरेल शिवगीतांची साथ… शिव-शंभूभक्तांचा उसळलेला उत्साह… आणि साक्षात वरुणराजाचा जलाभिषेक! अशा थरारक व ऐतिहासिक क्षणांचा अनुभव पिंपरी-चिंचवडकरांनी घेतला.
निमित्त होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच शिल्प ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथे आयोजित गगनभेदी ढोल-ताशा मानवंदनेचे. हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने हा भव्य सोहळा मोशीतील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रात पार पडला.
‘रेकॉर्ड ब्रेक’ सोहळा
हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पावसानेही उपस्थिती लावत वातावरण भारून टाकले. तरीदेखील ऐतिहासिक मानवंदना ‘रेकॉर्ड ब्रेक’ ठरली. ३ हजारांहून अधिक ढोल, १ हजार ताशे व ५०० भगवे ध्वज यांच्या गजरात शंभुराजांना अभिवादन करण्यात आले.
शिवगर्जना व मर्दानी खेळ
कार्यक्रमात अवधूत गांधी यांनी “शिवबा राजं…”, “युगत मांडली…” यांसारखी गाजलेली शिवगीते सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. संतपीठ चिखलीच्या माध्यमातून कीर्तन सादर झाले. तर मर्दानी खेळ, बाल शिवभक्तांची शिवगर्जना या क्षणांनी वातावरण भारावले.
स्मारकाचा उद्देश जाहीर
या वेळी प्रा. इंद्रजीत भोसले यांनी स्मारकाच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. “छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांचे स्वराज्य, पराक्रम, धर्मनिष्ठा व ज्ञाननिष्ठा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, त्यांचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करणे हे ट्रस्टचे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.
धर्मार्थ राज्या कृतीशील वीरः।
संभाजिराजो नृपसिंहधीरः॥
स्वाभिमानस्य तेजो स्वरूपं।
वंदे स्मरामि सततं स्वराटम्॥जय श्रीराम..! जय शिवराय….जय शंभूराजे…! 🚩@HSmarkTrust@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@VHPDigital@BajrangDalOrg@sakal_hindu_@HinduITCell#StatueOfHindubhushan… pic.twitter.com/W39V1fMmkr
— Mahesh Landge (@maheshklandge) September 15, 2025
लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक जगातील सर्वांत उंच शिल्प म्हणून ‘लंडन बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंदले गेले आहे. ढोल-ताशांच्या उपस्थितीत देण्यात आलेली मानवंदना देखील पहिल्यांदाच जागतिक विक्रम म्हणून नोंदली गेली. यावेळी हिंदू भूषण ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
महेश लांडगे यांचे आक्रमक वक्तव्य
“माता-भगिनींवर अन्याय झाल्यास गप्प बसणार नाही. अशा नराधमांचा चौरंग्या केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिला. ‘‘धर्मनिष्ठा आणि कर्मनिष्ठा हेच माझे ब्रीद असून, धर्मवीर शंभूराजांच्या विचारांच्या प्रेरणेने आम्ही समाजासाठी लढत राहू,’’ असे ते म्हणाले.
अचूक नियोजनामुळे यशस्वी सोहळा
या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी शंभरहून अधिक नामांकित ढोल-ताशा पथके महाराष्ट्रभरातून दाखल झाली होती. पार्किंग, भोजन, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा यांसह सर्व सोयी-सुविधांचे अचूक नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे हजारोंच्या उपस्थितीतही सोहळा सुरळीत पार पडला. दाही दिशा घुमलेल्या ढोल-ताशांच्या गजरात ‘शंभुराजे, शंभुराजे’ जयघोष घुमला आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभूतपूर्व अशा ऐतिहासिक मानवंदनेचा सोहळा पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवला.