
Chandrapur News: राजकारणात नवा फॉर्म्युला! अनुभवी नेतृत्वासोबत नव्या चेहऱ्यांचा उदय, विकासाची अपेक्षा वाढली
गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूरचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. त्यामुळे शहरातील समस्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत चाललेली आहे. येणाऱ्या भविष्यकाळाचा विचार करता यावेळी चंद्रपूरकरांनी नवीन चेहऱ्यांना संधी देत विकासाचा एजेंडा ठेवला आहे. महापालिका निवडणुकीत तब्बल ४९ नवीन उमेदवारांना विजयश्री मिळाले. हे नवीन चेहरे नगरसेवक म्हणून महापालिकेत एंट्री करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कुठलाही अनुभव नसणाऱ्या या उमेदवारांची सभागृहातील कामगिरी कशी राहणार, याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे. मनपा निवडणुकीत तिकीट वाटपावरून भाजप व काँग्रेसमध्ये घमासान झाले होते. (फोटो सौजन्य – AI Created)
पक्षातंर्गत वादातून जुन्या कार्यकर्त्याचे तिकीट कापून नवीन उमेदवारांना पक्षाची लॉटरी लागली. निवडणुकीच्या प्रचारात काही मतभेद वगळता शेवटच्या टप्प्यात या नवख्या उमेदवारांना ज्येष्ठांची मदत मिळाली. तरुण व उत्साही उमेदवारांकडे पाहून आपापल्या प्रभागातील मतदारांनी पसंती दिली. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात ४९ उमेदवार नगरसेवक झाले. यातील बहुतांश नगरसेवक ३० ते ४५ च्या आत आहेत. यामध्ये भाजप, काँग्रेस, उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, एआयएमआयएम पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे.
महापालिका प्रशासन व राजकारणाचा अनुभव असणारे १७ माजी नगरसेवकही या अटीतटीच्या निवडणुकीत विजयी झाले. यात सुभाष कासनगोडुवार, शीतल गुरनुले, जयश्री जुमडे, संगीता भोयर, पुष्पा उराडे, राजलक्ष्मी कारंगल, राजेश अडूर, पप्पू देशमुख, सविता कांबळे, राहुल पावडे, राहुल घोटेकर, संजय कंचांवार, नंदू नागरकर, लता साव, वसंत देशमुख, संगीता खांडेकर, प्रशांत दानव यांचा समावेश आहे. त्यामुळे नविन उमेदवारांच्या जोडीला अनुभवी उमेदवारांची साथ मिळून शहराच्या विकासात हातभार लागेल.
नवीन उमेदवार शहरांच्या विकासासाठी कोणते निर्णय घेणार, त्यांच्या नेतृत्वात शहरात कोणते बदल केले जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. खरं तर मनपा निवडणुकीत तिकीट वाटपावरून भाजप व काँग्रेसमध्ये घमासान झाले होते. मात्र पक्षातंर्गत वादातून जुन्या कार्यकर्त्याचे तिकीट कापून नवीन उमेदवारांना संधी मिळाली. याच गोष्टीचा फायदा आता शहराच्या विकासाला होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.