'हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखंच'; चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान करत सपकाळांना टोला लगावला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, ‘रामनवमीनिमित्त सगळ्यांनी शुभेच्छा देतो, आज भारतीय जनता पक्षाचा 46 वा स्थापना दिवस आहे. आज विभागीय कार्यालयाचे भूमीपूजन झालं. नागपूर महाकार्यालय, विभागीय कार्यालय, विदर्भ कार्यालय. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. विदर्भ कार्यालय विदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी बांधणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
तसेच सपकाळ यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘राज्यात संस्कृती आहे, आपण धर्मासाठी समर्पित आहोत, त्यांनी आजच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली उंची तपासून पाहावे, नंतर फडणवीसांवर बोललं पाहिजे’, असेही त्यांनी सांगितले.
…त्यामुळे मी त्यांच्यावर बोलत नाही
संजय राऊत यांच्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘त्यांना फार मोठा आजार झाला आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर बोलत नाही’, असे म्हणत अधिक बोलणं त्यांनी टाळले.
भाजप-युतीच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची केली फसवणूक
भाजप-युतीच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः घेतलेले निर्णयही अंमलात आणू शकत नाहीत. एक एप्रिलपासून वीजबील १० टक्के कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ मार्च रोजी केली. पण १ एप्रिलला महावितरणमार्फत वीज नियामक आयोगात याचिका दाखल करून दर कपातीला स्थगिती मिळवून जनतेला एप्रिलफुल केले, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता. त्यानंतर आता बावनकुळे यांनी हे विधान केले आहे.