
शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चांवर बावनकुळेंचे मोठं विधान; म्हणाले, 'भाजप हायकमांड निर्णय...'
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळींची विधानं चर्चेचे कारण ठरत आहेत. असे असताना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी शरद पवारांबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यावर आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शरद पवारांना समाविष्ट करण्याचा अधिकार आम्हाला नाही; हा निर्णय केवळ भाजप हायकमांड घेईल, असे त्यांनी म्हटले आहे.
शरद पवार नजीकच्या काळात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होऊ शकतात असा दावा शिरसाट यांनी केला आहे. मुंबईत नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकीकरणावर भाष्य करताना शिरसाट म्हणाले की, पुण्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आहे. मुंबईतही असेच घडत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी त्याकडे लक्ष द्यावे. आम्हाला नवाब मलिक मान्य नाहीत, म्हणून आम्ही युतीत नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) एकत्र येत असतील तर ती त्यांची अंतर्गत बाब आहे. परंतु, जर तसे झाले तर त्या वेळीच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिका निवडणुकीमुळे राज्यात सध्या विविध आघाड्या आणि युती तयार होत आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी शरद पवारांबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
NDA मध्ये समावेश करण्याचा अधिकार हायकमांडला
शरद पवारांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत समाविष्ट करण्याचा अधिकार आम्हाला नाही; हा निर्णय केवळ भाजप हायकमांड घेईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांसारखे ज्येष्ठ नेते यावर चर्चा करतील. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवत आहेत. आम्ही महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या आहेत. स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला देण्यात आला आहे. याचा अर्थ असा नाही की राज्यातील महायुती युतीवर परिणाम होईल.
पवार भविष्यात काहीही करू शकतात
ते पुढे म्हणाले, आमच्या युतीत सामील होऊ इच्छित असतील तर ते स्वतः निर्णय घेतील. पवार भविष्यात काहीही करू शकतात. ते नेहमीच एकाच बाजूने असतील असे गृहीत धरणे चुकीचे आहे. त्यांनी अनेक वेळा आपली भूमिका बदलली आणि पक्षांचे विलीनीकरणही केले आहे.
हेदेखील वाचा : Pune Politics : दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा फिस्कटल्या; पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?