
जायकवाडीत परदेशी पाहुण्यांचा किलबिलाट! ७९ प्रजातींच्या ३२ हजार पक्ष्यांची नोंद (photo Credit- X)
मुफिद पठाण । नवराष्ट्र पैठण: जायकवाडी पक्षी अभयारण्यात २०२६ आशियाई पाणपक्षी गणना अंतर्गत यंदा विक्रमी संख्येने पाणपक्षी आढळून आले असून, तब्बल ७९ प्रजातींच्या ३२ हजार ७४५ पाणपक्ष्यांची नोंद घेण्यात आली आहे. ही गणना १८ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर (वन्यजीव) विभागाच्या वतीने, उपवनसंरक्षक रेवती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. (भावसे) या गणनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या ३३९७९ हेक्टर क्षेत्रातील ४१ ठिकाणांची निवड करण्यात आली होती. यापैकी ६ ठिकाणी थेट बोर्टीच्या सहाय्याने जलाशयाच्या आत जाऊन पक्षी गणना करण्यात आली. या मोहिमेत छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यातील पक्षीमित्र, तज्ज्ञ व वन्यजीव विभागाचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.
यंदा बार-हेडेड गूज, ब्राह्मिणी शेल्डक, गार्गेनी, नॉर्दर्न पिटेल, कॉमन पोचार्ड यांसारखे स्थलांतरित पाणपक्षी मोठ्या संख्येने आढळून आले, हे पक्षी रशिया, चीन, मंगोलिया आदी देशांतून जायकवाडीत येतात.
लिटल ग्रेब, ग्रेट व लिटल कॉर्पोरेट, पेटेड स्टॉर्क, एशियन ओपनबिल, ग्लॉसी आयधिस, ब्लॅक नेक आयबिस, ऑस्प्रे, पर्पल स्वामफेन, कॉमन कूट, रेड बॉटल लॅपविंग, रिव्हर टर्न, व्हिस्कर्ड टर्न, किंगफिशर यांसह अनेक दुर्मिळ व आकर्षक प्रजातींची नोंद झाली. याशिवाय जलाशय परिसरात जवळपास ३० प्रकारचे स्थलपक्षी देखील आढळून आले.
ही गणना पक्ष्यांची संख्या, स्थलांतराचा अभ्यास आणि अभयारण्यातील पर्यावरणीय स्थिती समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यंदाची वाढलेली संख्या जायकवाडी अभयारण्याच्या समृद्ध जैवविविधतेचे द्योतक असल्याचे तज्ज्ञानी सांगितले. या मोहिमेत सहाय्यक वनसंरक्षक (पैठण) प्रमिला मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ, मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक, तसेच अनेक तज्ज्ञ, पक्षीमित्र व वनकर्मचारी सहभागी झाले होते.