लर्निंग लायसन्स काढताय? तर थांबा ! एनआयसीला परिवहन विभागाकडून दिले गेले स्थगितीचे पत्र
वाहन चालवताना वाहन परवाना गरजेचा असतो. जर तो नसेल तर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यातच आता फेसलेस शिकाऊ वाहन परवान्याचा गैरफायदा घेण्याचे प्रमाण वाढल्याने हा परवाना काढण्याच्या पद्धतीत सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी फेसलेस शिकाऊ वाहन परवाना प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती द्यावी, असे पत्र परिवहन विभागाने नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरला (एनआयसी) पाठवले आहे.
तसेच राज्य सरकारने तज्ज्ञ समितीमार्फत या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागितला आहे. समितीच्या शिफारशींवर आधारित सुधारणा करण्यात येणार आहे. 18 वर्षे पूर्ण झालेली मुले-मुली शिकाऊ वाहन परवाना घेतात. शिकाऊ वाहन परवाना चालकासोबत एक कायमस्वरूपी वाहन परवाना असलेली व्यक्ती असणे गरजेचे आहे. परंतु, या सर्व नियमांना फाटा देत काही चालक बेदरकार वाहन चालवतात. अनेक ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह अपघातात संबंधित चालकाकडे केवळ शिकाऊ परवाना असल्याचे निदर्शनास आले आहे.
हेदेखील वाचा : वाहतूक कोंडीने घेतला 2 वर्षीय चिमुकल्याचा जीव! रुग्णवाहिका 5 तास थांबली अन् बाळाने आईच्या कुशीत जीव सोडला
दरम्यान, अशा गंभीर प्रकरणांना आळा घालण्यासाठी फेसलेस शिकाऊ वाहन परवाना देण्याची पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. मंत्रालयात परिवहनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लर्निंग लायसन्स प्रणालीतील त्रुटींवर चर्चा झाली. फील्ड अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तपासणीतून फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणालीमध्ये आढळलेल्या तांत्रिक व सुरक्षेसंबंधी त्रुटी सादर केल्या.
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न
बनावट लर्निंग लायसन्स जारी होण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रस्ता सुरक्षेसोबतच राष्ट्रीय सुरक्षेचाही गंभीर प्रश्न उपस्थित होऊ शकतो. यामुळे मोटर वाहन कायदा कलम ३, ४, ८ तसेच केंद्रीय मोटर वाहन नियम ११, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ ‘सी’ व ६६ ‘डी’ आणि आधार अधिनियम २०१६ मधील तरतुदींचा भंग होतो.
तांत्रिक सुरक्षा उपाययोजना करण्यास सांगावे
परिवहन आयुक्त कार्यालयाने नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरला तातडीचे पत्र देऊन तांत्रिक सुरक्षा उपाययोजना करण्यास सांगावे. तोपर्यंत सर्व लर्निंग लायसन्स चाचण्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या थेट नियंत्रणाखाली व काटेकोर तपासणीसह पार पाडल्या जाव्यात.
– प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री