
रायगड : सध्या शाळांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांची सफर घडवत आहेत. अनेकजण शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडाला भेट देत असतात. आणि इतिहासाच्या खाणाखूणा पाहत असतात. तुम्ही गड रायगड पाहण्याची तयारी करत असाल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. येत्या दोन दिवसांसाठी किल्ले रायगडाचा पायरी मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. तसेच शिवराज्याभिषेक सोहळा देखील जवळ आला आहे. त्यामुळे किल्ले रायगडाचे डागडुजीचे काम काढण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी (दि.23 मे) व शुक्रवारी (दि.24 मे) रायगडाचे पायरी मार्ग पर्यटकांसाठी बंद ठेवण्य़ात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माहिती दिली असून पर्यटकांची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.
जंजिरा किल्ला पाहण्याचा प्लॅन करत असाल तर थांबा! ‘या’ तारखेपासून किल्ला राहणार बंद
येत्या 6 जून रोजी 351 वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक शिवभक्त व पर्यटक राजधानी रायगडावर येत असतात. यावेळी गडावर दरड कोसळू नये याची काळजी प्रशासनातर्फे घेतली जात आहे. मागील वर्षी दरड कोसळ्यामुळे एका शिवभक्ताचा जीव देखील गेला आहे. त्यामुळे या वर्षी अधिकची काळजी घेतली जात आहे. उपाययोजना करण्यासाठी दोन दिवस 23 मे व 24 मे रोजी किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पायरी मार्ग दोन दिवस बंद असल्याने किल्ले रायगडावर जाण्याचा विचार या दोन दिवसांमध्ये करु नये.