Chhawa bollywood movie controversy over Sambhaji Raje and Yesubai Lezim
कोल्हापूर : बॉलीवुडच्या सध्या ‘छावा’ चित्रपटाची संपूर्ण देशभरामध्ये चर्चा आहे. ‘छावा’ चित्रपटामध्ये हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचे जीवन चरित्र मांडले आहे. यामध्ये अभिनेता विक्की कौशल छत्रपती संभाजीराजे आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसूबाई यांची भूमिका करत आहे. नुकताच या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे. मात्र यामध्ये महाराज आणि महाराणी नाचताना व लेझीम खेळताना दाखवण्यात आले आहे. यावरुन आता राजकारण तापले असून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे.
माजी खासदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बॉलीवुडच्या ‘छावा’ चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटाचा टीझर प्रसारित करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग दाखवण्यात आले आहे. टीझरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि राणी येसुबाई लेझीम खेळताना दाखवले आहेत. यावरुन शिवप्रेमींच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. महाराज व महाराणींना अशा प्रकारे लेझीम खेळताना दाखवल्यामुळे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माध्यमांशी संवाद साधत असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “छावा या नावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट येत आहे. ही आनंदाची बातमी आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यातून पुढे येईल. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची टीम मला येऊन भेटली होती. त्यांनी ट्रेलरची क्लिप मला दाखवली. पण मी त्यांना संपूर्ण चित्रपट दाखविण्याची मागणी केली होती. तसेच मी त्यांना काही इतिहासकार जोडून देणार होतो, जेणेकरून चित्रपटात एखादी चूक असेल तर ती दुरूस्त करता येईल. पण त्यांनी इतिहासकारांशी भेटण्यात स्वारस्य दाखवले नाही.” असा टोला संभाजीराजे छत्रपती यांनी लगावला आहे.
पुढे संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना आणि नृत्य करताना दिसत आहेत. लेझीम हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. लेझीम खेळणे चूक नाही. पण त्या गाण्यावर नृत्य करणे, हे कितपत योग्य आहे? सिनेमॅटिक लिबर्टीमध्ये हे घ्यायला हवे का? यावर चर्चा करणे आवश्यक आहे”, असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. तसेच लेझीम खेळणे चुकीचे नाही, असेही ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यात देखील लाल महालाच्या बाहेर काही शिवप्रेमींनी छावा चित्रपटातील या नृत्यावर आक्षेप घेत विरोध केला आहे. शिवप्रेमींनी घोषणाबाजी करुन चित्रपट कुठेच प्रदर्शित होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “दिग्दर्शक उतेकर यांनी १०० ते २०० कोटी रुपये खर्च करून छत्रपती संभाजी महाराजांवरील हिंदी चित्रपट तयार केला आहे. या माध्यमातून महाराजांचा इतिहास जगभरात जाणार आहे. पण त्यांनी ट्रेलरमध्ये महाराज नृत्य करताना दाखविल्यामुळे ते लोकांना कितपट पटेल, याबाबत शंका वाटते. त्यामुळेच त्यांनी आम्हाला विनंती केल्यास आम्ही राज्यातील महत्त्वाचे इतिहासकार बसून यावर चर्चा केली. तर त्यातून मार्ग निघेल,” अशी भूमिका माजी खासदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे.