Chhawa Sanghatana Latur Bandh andolan against manikrao kokate and sunil tatkare
Chhawa Sanghatana : लातूर : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळातील रम्मी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बळीराजावर आत्महत्येची वेळ आलेली असताना कृषीमंत्री सभागृहात बसून गेम खेळत असल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी छावा संघटनेकडून केली जात आहे. मात्र ही मागणी करताना त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर पत्ते फेकण्यात आले यामुळे वाद चिघळला आहे.
लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषदेत झाली. यावेळी प्रचंड राडा पहायला मिळाला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संतप्त झालेल्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवत थेट पत्रकार परिषदेतच राजीनाम्याची मागणी केली. यावेळी पत्ते फेकून घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर छावा संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती आहे. यावेळी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या समर्थकांनी मारहाण केली. यामुळे आता छावा संघटना आक्रमक झाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याने लातूरमध्ये वातावरण तापले आहे. लातूरमध्ये छावा संघटनेने बंद पुकारला असून आंदोलन देखील छेडले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तसेच आक्रमक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा फोटो देखील फाडला. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्यानंतर त्यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी केली आहे. यावरुन आता राजकीय वातावरण तापले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, “राज्यातला शेतकरी प्रचंड संकटात असताना राज्याचे कृषिमंत्री सभागृहात रमीचे पत्ते फेकत असतील तर जनतेत संतापाचा आगडोंब उसळणारच आहे. या विषयावर लातूर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे साहेबांना निवेदन देत असताना झालेला वाद दुर्दैवी आहे. तटकरे साहेबांवर अशा प्रकारे पत्ते फेकणे चुकीचेच आहे, परंतु त्यांनतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना करण्यात असलेली मारहाण अधिक चुकीची आहे. लोकांनी प्रश्न विचारले की आम्ही फटके देऊ, हाणामारी करू आणि विरोध चिरडून टाकू हा संदेश सत्ताधारी देऊ पाहत आहेत का?” असा सवाल रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.