कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रम्मी व्हिडिओवर कॉंग्रेस विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज नव्या घडामोडी घडत आहेत. कधी सत्ताधारी मंत्री कॅन्टिन चालकाला मारहाण करत आहे तर कधी विधीमंडळाच्या आवारात फ्री स्टाईल हाणामारी सुरु आहे. आता अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेमध्ये रम्मी खेळताना व्हिडिओ समोर आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यावरुन राज्याचे वातावरण तापले असून या प्रकरणावरुन कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यामध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर संताप व्यक्त केला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, हे नेते भ्रष्ट सरकार आहे. हे जनतेच्या बोकांडी बसलेल नतभ्रष्ट सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार पुन्हा होणार नाही. कोणाचीच परवा नसलेल हे सरकार आहे. शेतकरी कर्जाखाली जपलेला आहे. आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करत आहे. वन थर्ड शेतकरी हे पीक विम्याचे राज्य सरकार भरत होतं. आता पूर्णतः पिक विमा शेतकऱ्याला भरायचा आहे. मत घ्यासाठी एक रुपयात विमा आता मात्र तुमचं तुम्ही बघा अशी भूमिका सरकार घेत आहे, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, भाजपने माणिकराव कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केलाय. त्यामुळे यांना काम उरलेले नाही, म्हणून ते रमी खेळत आहे. किंवा अधिकार नसल्यामुळे यांना काही करायची इच्छा नसेल कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी अवस्था झाली आहे, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कोकाटे यांच्या गेम खेळण्याच्या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे.
मंत्र्यांना त्या पदावर ठेवावं का?
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन चालकाला शिळे अन्न दिल्यामुळे मारहाण केली आहे. यावरुन विजय वडेट्टीवार म्हणाले की, चड्डी बनियान लुंगी बनियान वाले. मंत्री गुंडांना सोबत घेणारे आमदार, काय चाललंय महाराष्ट्रात… यातून शेतकऱ्यांना तुमचं सरकार नाही.. तुमचं तुम्ही बघून घ्यावं. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कणव असेल तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवावं का हा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील, अशी अपेक्षा विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती संभाव्य आहे. यावर मत व्यक्त करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, दोघं भावाच काय होतं, ते एकदा होऊ द्या. निवडणूका घोषित झाल्यावर आम्ही ठरवू, आम्ही स्थानिक पातळीवर मुंबई महानगरपालिका इतर नगर पालिका संदर्भात स्थानिक नेत्यांना अधिकार दिलेला आहे. ही विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक नाही. कार्पोरेशन असे या सगळ्या ठिकाणी स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्यासाठी सांगितले ते निर्णय घेतील. उद्धव ठाकरे काय म्हणाले ते मला माहित नाही. अलीकडे बैठका महाविकास आघाडीच्याच होत आहे, महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम केलेलं आहे. विरोधीपक्ष नेत्यासाठी महाविकास आघाडी म्हणून बैठक घेतल्या आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढतील असे नाही, असे सूचक वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.