
ढगाळ वातावरणाने जिल्ह्यात हुडहुडी वाढली
छत्रपती संभाजीनगर : मागील महिनाभरापासून हवेत असलेल्या गारव्यात गुरुवारी (दि.२९) आणखी घट झाली होती. तर शुक्रवारी (दि. ३०) रोजी देखील हवामान अपेक्षेपेक्षा थंड राहिले. परिणामी, व्हायरल साथीच्या आजारांनी लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील शितवारे महाराष्ट्रात दाखल होत असल्याने राज्यातील हवेत कमालीचा गारवा पसरला आहे. याचा परिणाम मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर शहरातदेखील अनुभवण्यास येत आहे.
शहरात रोज बदलणाऱ्या वातावरणाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सर्दी, डोकेदुखी, अंगदुखीसह ताप आणि व्हायरल आजारांनी डोके वर काढले आहे. मागील तीन दिवसांत क्लिनिकमध्ये रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे. तरुणांच्या तुलनेत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना हवामान बदलाचा अधिक परिणाम होतो. लहान मुले आणि ज्येष्ठांना सर्दीमुळे छातीत कफ होणे आणि श्वसनाच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. अशावेळी थंड पाणी पिणे टाळणे, पहाटे, सायंकाळी आणि रात्रीच्या गारव्यात बाहेर पडणे टाळणे आवश्यक आहे.
दरम्यान, आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे. काही दिवस हा गारवा कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शुक्रवारी तापमानात घसरण
शहरात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पहाटे, सायंकाळी आणि रात्री कमालीचा गारवा अनुभवायला मिळाला. ढगाळ वातावरणासह किमान तापमानासह कमाल तापमानदेखील घसरल्याने हवेत कमालीचा गारवा पसरला होता. गुरुवारी किमान तापमानात अडीच अंशाची घट होऊन किमान तापमान १४.८ अंश सेल्शिअसची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली होती तर शुक्रवारीदेखील वातावरण थंड होते. कमाल २९.४ तर किमान तापमान १६.२ अंश सेल्शियसची नोंद चिकलठाणा वेधशाळेने केली.
फेब्रुवारीत किमान तापमान पुन्हा घसरणार
शहरात जानेवारीच्या सुरुवातीला रात्रीचे तापमान १३ ते १४ अंश सेल्शियसच्या दरम्यान होते. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ते १० ते ११ अंशादरम्यान गेले. १३ जानेवारीपासून तापमानात वाढ होण्यात सुरुवात झाली. हवेतील आर्द्रता सकाळी ६८ टक्के तर सायंकाळी ५० टक्के इतकी राहिली. ३१ जानेवारीपर्यंत कमाल तापमान ३० ते ३१ अंशापर्यंत जाण्याची शक्यता असून १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान किमान तापमानासह पुन्हा किंचित घट होऊन पारा १५ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Weather : हवामान बदलणार ! राज्यात थंडीचा जोर कमी, कसा होणार परिणाम? जाणून घ्या सविस्तर अपडेट