मुख्यमंत्री अन् संतोष देशमुख यांच्या फोनवरून चर्चा; देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आश्वासन?
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देखमुख यांची निघृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी फडणवीसांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत त्यांना काही माहिती दिली. तसंच आरोपींवर कोणती कारवाई करणार याचं आश्वासनही दिलं आहे.
दिवंगत संतोष देखमुख यांच्या भावाची फोनवरुन चर्चेवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना आरोपींना कडक शासन करण्याबाबत आश्वस्त केलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की, जोपर्यंत हे सगळे फासावर लटकत नाहीत, संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही कमी पडणार नाही. मग आरोपी कोणीही असले तरी त्यांना सोडणार नाही, अशी माहिती संतोष देखमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
या प्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी वाल्मिक कराड हा आज पुण्यात सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर सरेंडर झाला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, बीडच्या प्रकरणात कोणालाही आम्ही सोडणार नाही, अतिशय कडक कारवाई केली जाईल. गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही. यात तपास अतिशय गतिशील करण्यात आला आहे, त्यामुळंच त्यांना शरणागती पत्करावी लागली आहे. हत्येत इतर जे आरोपी सामिल आहेत त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम कामी लागल्या आहेत. कोणालाही आम्ही सोडणार नाही.
संतोष देशमुख यांच्या बंधुंशी माझं फोनवरुन बोलणं झालेलं आहे. जोपर्यंत आरोपी फासावर लटकत नाहीत तो पर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील. कोणता गुन्हा दाखल होईल? काय होईल? हे सर्व पोलीस सांगतील. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला दिली आहे, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. कोणाचाही दबाव त्यांच्यावर चालू देणार नाही.
आज सकाळी सुमारे साडेबाराच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील केज या ठिकाणी एफआयआर नंबर ६३८/२०२४ मधील आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सीआयडीच्या मुख्यालयात हजर झाला. त्याला पुणे सीआयडीने ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी करुन त्याला बीडकडे रवाना करण्यात आलं आहे. आरोपी वाल्मिक कराडसोबत आमच्या टीमसह बीडचे तपास अधिकारीही आहेत. बीड सीआयडी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता बंदोबस्तात बीडकडे त्याला रवाना करण्यात आलं आहे, पुढची तपासणी गुजर हेच करतील. सीआयडीचे डीवायएसपी आहेत त्यांच्या ताब्यात फरार आरोपीला देण्यात आलं आलं आहे.