Badlapur Crime News: बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...
ठाणे: बदलापूर येथे शाळकरी मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. याचदरम्यान बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. पोलीस त्याला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्यानं पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पोलिसांनी स्ववसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.
दरम्यान अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटरवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. अक्षय शिंदे केलेल्या गोळीबारात पीआय निलेश मोरे हे जखमी झाले आहेत. मात्र यावर आता विरोधी पक्षाने टीका केली आहे. हा एन्काऊंटर बोगस असून, या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी हे करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी हे कृत्य केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सुषमा अंधारे, खासदार अमोल कोल्हे यांनी या प्रकरणावर सवाल उपस्थित केले आहे.
दरम्यान या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, ”बदलापूर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे हा आरोपी होता. याच आरोपी अक्षय शिंदेंवर त्याच्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. या प्रकरणात त्याला तपासासाठी बाहेर आणल्यानंतर त्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्यावर गोळी झाडली. त्यात निलेश मोरे जखमी झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी स्ववसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या आहेत. याचा पोलीस तपास सुरु आहे. निलेश मोरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.”
विरोधकांच्या टिकेबद्दल एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”ज्यावेळेस बदलापूरची घटना घडली तेव्हा विरोधक आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते. ज्याने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले त्याची बाजू जर विरोधक घेत असतील तर, हे दुर्दैव आहे. अशा प्रकारे आरोपीची बाजू घेणे हे निंदाजनक आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. विरोधी पक्षाला विरोधात बोलण्याचा अधिकार आहे. आज एक पोलीस अधिकारी जखमी आहे. त्याच काहीच घेणंदेणं विरोधी पक्षाला नाहीये. पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात. विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने त्यांची झोप उडवलेली आहे.त्यामुळेच हे उलट सुलट आरोप ते करत आहेत.”
# Live📡| 🗓️ 23-09-2024
📍मुंबई
🎥 पत्रकारांशी संवाद https://t.co/DblCCZLxRS— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 23, 2024
दरम्यान बदलापूर येथील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. अक्षय शिंदेचे आतापर्यंत तीनवेळा लग्न झाले आहे. बदलापूर पूर्वेकडील खरवई गावात राहणारा आरोपी अक्षय शिंदे हा अवघा २४ वर्षांचा असून, त्याने यापूर्वी तीन लग्न केले होते. त्याच्या या कृत्यामुळे तिन्ही पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत. 10 वी पास अक्षय शिंदे हा यापूर्वी एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याला कंत्राटावर गार्डची नोकरी मिळाली. अक्षय हा कर्नाटकातील गुलबर्गा गावचा असून त्याचा जन्म बदलापूरच्या खरवई गावात झाला. तो खरवई गावातील चाळीत आई-वडील, भाऊ आणि भावाच्या पत्नीसह राहतो. शाळेत मुलींचा शारीरिक छळ झाल्याची घटना घडल्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली. त्याच्या नातेवाईकाच्या घरावरही गावकऱ्यांनी हल्ला केला. तेव्हापासून अक्षय आणि त्याचे कुटुंब खरवई गावातून बेपत्ता आहे. गावातील महिलांनी सांगितले की, अक्षयने तीन लग्न केले आहेत, मात्र सध्या त्याच्यासोबत कोणतीही पत्नी राहत नाही.