
लाडक्या बहिणींनो, 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करा
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या योजनेचा हजारो पुरुषांनी फसवणूक करून लाभ घेतला. त्यामुळे सरकारकडून ई-केवायसी करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असणार आहे.
लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. यानुसार, या योजनेतील सर्व पात्र महिलांना दरवर्षी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणींमुळे काही महिलांना अडचणींचा सामना करावा लागला. परंतु, आता संबंधित सर्व्हरमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. मंत्री आदिती तटकरेंनी या प्रक्रियेसाठी अंतिम तारीख १८ नोव्हेंबर असल्याची घोषित केली आहे. १८ सप्टेंबर २०२५ पासून अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध झाली असून, दोन महिन्यांच्या कालावधीत अनेक लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
हेदेखील वाचा : लाडकी बहीण योजनेत पुरुषांची ‘एंट्री’; तब्बल ‘इतक्या’ पुरुषांनी घेतला लाभ, सरकारला 24 कोटींचा बसला फटका
दरम्यान, उर्वरित महिलांनीही दिलेल्या अंतिम तारीखेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन आदिती तटकरेंनी केले आहे. यामुळे योजनेसाठी पारदर्शकता वाढेल आणि लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळू शकतील.
नियमबाह्य पद्धतीने लाटले पैसे
या योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी सरकारने काही निकष निश्चित केले होते, ज्या अंतर्गत एका कुटुंबातील फक्त दोन महिला पात्र होत्या. शिवाय लाभार्थी महिलेचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिला या योजनेसाठी अपात्र मानल्या.
तब्बल ७७९८० अपात्र महिलांनाही फायदा
असे असूनही ७७९८० अपात्र महिलांनी अनेक महिन्यांपासून या योजनेचा बेकायदेशीरपणे लाभघेतला आहे. सरकारने एकूण १६४.५२ कोटी रुपये अपात्र खात्यांमध्ये हस्तांतरित केले, ज्यापैकी १४०.२८ कोटी रुपये महिलांना मिळाले.