... 'हा' RSS चा वैचारिक पराभव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सडकून टीका
नागपूर : महात्मा गांधी यांनी समाजवाद, सामाजिक न्याय, सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली तर असत्य आणि हिंसा ही संघाची विचारधारा आहे. देशाच्या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार असल्याचा अपप्रचार संघ व संघ परिवाराने केला. परंतु द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणी मांडला हे सर्वांना माहित आहे, पण बदनामी मात्र महात्मा गांधींची करण्यात आली परंतु आज तोच संघ महात्मा गांधी यांना शरण गेला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरु झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पदयात्रा पुन्हा सुरु झाली, दुपारी सावंगी येथे विश्रांती घेण्यात आली व रात्रीचा मुक्काम खडकी येथे आहे. या पदयात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री वसंत पुरके, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र मुळक, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भोयर, सरचिटणीस संदेश सिंघलकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, खोटे बोलून आज भाजपा सत्तेत आला आहे पण महात्मा गांधी नावाचा संत भाजपा व आरएसएसच्या मानगुटीवर बसलेला आहे. संघाच्या १०० व्या वर्षी सुवर्णयोग आलेला असून, भारताचे संविधान व महात्मा गांधी यांचे विचार संघाने स्विकारावे असे आवाहन काँग्रेसने केले आहे पण रा. स्व. संघाकडून अद्याप उत्तर मिळालेले नाही, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
भारत पाकिस्तान आशिया चषक भारताने पहिल्यांदाच जिंकलेला नाही परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र यातही राजकारण करण्यांची संधी सोडली नाही. हवा असो, पाणी असो किंवा खेळ असो नरेंद्र मोदी ध्रुवीकरण करण्यासाठी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणतात हे त्यांच्या एक्सवरील पोस्टवरून स्पष्ट होते. भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, पण देशाची एक विशिष्ट प्रतिष्ठा असते ती मात्र नरेंद्र मोदी जपत नाहीत, असेही सपकाळ म्हणाले.