सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. अनेक नेतेमंडळी, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. असे असताना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्यासह त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपकडून ‘ऑफर’ देण्यात आली आहे. याबाबतची माहिती स्वत: शिंदे यांनी दिली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे ते बोलत होते. ते म्हणाले, ‘माझा दोन वेळा पराभव झाला असला, तरीही प्रणिती ताईला किंवा मला भाजपकडून आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही’, असे म्हणत काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे बोलून दाखवले.
पुन्हा चांगले दिवस येतील
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आता मी 83 वर्षांचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं बरोबर आहे असं कसं म्हणेल. प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही. राजकारणामध्ये असे (पराभव) होतं राहतात. चालताना पडतो पुन्हा उठतो, पुन्हा पडतो, पुन्हा उठतो. मग तो जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, आज वाईट दिवस आहेत. मात्र, ते दिवस निघून जातील’.
सोलापूरचे पालकमंत्री घेणार शिंदेंची भेट
सुशीलकुमार शिंदे यांनी हा दावा केल्याने महाराष्ट्रात राजकारणात एकच चर्चा सुरु झाली आहे. त्यातच आज सायंकाळी पाचच्या सुमारास राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी शिंदे यांनी हे विधान केल्याने भेटीला आता एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.