शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा इशारा
नागपूर : गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून बळीराजावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांच्या संकटावरुन काँग्रेस पक्षाने सरकारला इशारा दिला आहे. राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत द्यावी अन्यथा एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
सपकाळ म्हणाले, राज्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे, शेतकऱ्याचे होते नव्हते ते सर्व वाहून गेले आहे, संसार उघड्यावर आला आहे. बळीराजाला आता मदतीची व आधाराची गरज आहे. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा व दुःख जाणून घेतले व भरीव मदत देण्याची मागणी सरकारकडे केली आहे पण सरकार या संकटाकडे गांभिर्याने पाहत नाही. मे महिन्यापासूनच पावसाने धुमाकुळ घातला आहे पण अद्याप राज्य सरकारने कोणताही अहवाल केंद्र सरकारला पाठवला नाही. महायुती सरकारच्या मंत्र्यांनी एक दिवस पाहणीचे नाटक केले व मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटले पण रिकाम्या हातानेच परतले. या भेटीत त्यांना शेतकऱ्यांपेक्षा सुरजागडच्या खाणीतच जास्त रस होता आणि त्यांनी पंतप्रधानांशी चर्चाही त्याच विषयावर केली.
बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवीच्या चरणी साकडे
अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बाधित गावांची पाहणी केली. शेतकऱ्यांचे दुःख जवळून अनुभवल्यानंतर माजी कृषिमंत्री काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी पाथर्डी तालुक्यातील श्री मोहटादेवीच्या चरणी प्रार्थना केली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ताकद दे आणि संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची केंद्र आणि राज्य सरकारला सद्बुद्धी दे. शेतकऱ्यांच्या ह्या वेदना सरकारच्या काळजापर्यंत पोहोचवण्याची आर्त प्रार्थना आई मोहटादेवीच्या चरणी थोरात यांनी यावेळी केली.
चाकण परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत
खेड तालुक्यासह चाकण शहर व परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकरी आणि व्यावसायिक वर्गाला बसला असून, सणासुदीच्या काळातही नागरिक पावसामुळे घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने पिके पाण्यात बुडाली आहेत. सोयाबीन, मका, फ्लावर, कोबी, भाजीपाला, इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. आधीपासूनच शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.