छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याने खळबळ, नौदलाचे तपासाचे आदेश, काँग्रेसचे आज निदर्शने
विजय काते, भाईंदर : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका किल्ल्यावरील मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पुतळा सोमवारी कोसळला. यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. अवघ्या आठ महिन्यात हा भव्य पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका करत कामाच्या दर्जाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केला. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. याचाच भाग म्हणून आज (28 ऑगस्ट) मिरा भाईंदर येथील काशिमीरा येथील छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्यासमोर काँग्रेसमार्फत आंदोलन करण्यात आले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे नौदलाचे पहिले जनक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भारतीय नौदलाच्या ध्वजावरही शिवरायांचा शाही शिक्का छापण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला याचा साक्षीदार म्हणून नौदलाने 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी मालवणच्या तारकर्ली समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ला संकुलात 2 कोटी 40 लाख 71 हजार रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा बसवण्यात आला. जमिनीपासून 45 फूट उंचीवर बसवण्यात आलेला हा पुतळा सोमवारी (26 ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास अचानक कोसळला.
पाया कमकुवत असल्यामुळे पाऊस आणि सोसाट्याचा वारा या मूर्तीला सहन होत नाही असे मानले जाते. याच विरोधात संपूर्ण राज्यभर काँग्रेस पक्षामार्फत आंदोलन करण्यात आले याचाच भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी आमदार मा. मुझफ्फर हुसैन मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले, यावेळी सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देण्यात आल्या कामातील भ्रष्टाचारामुळे पुतळा पडणे हा महाराजांचा अपमान आहे, असा आरोप करण्यात आला. या आंदोलनाच्या वेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, माजी नगर- सेवक जुबेर इनामदार, अनिल सावंत, राजीव मेहरा, प्रवक्ता प्रकाश नागणे, युवक जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.