Ajit Pawar: "आता बारामतीवासीयांना मी नाही तर,...''; अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सध्या सुरू आहे. आज अजित पवारांनी बारामतीमधील एका मेळाव्याला संबोधित केले. यावेळी मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बारामतीतून निवडणूक लढणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव अजित पवारांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. आजच्या कार्यक्रमात त्यांनीमनातील खदखद देखील बोलून दाखवली. या कार्यक्रमात अजित पवार नक्की काय म्हणाले आहेत, ते पाहुयात.
बारामतीमधील एका मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले, ”आपण लाखो मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. आता मी ६५ वर्षांचा झालो आहे. आता मी समाधानी आहे. आता बारामतीवासियांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे. ” अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी सुरू केली. ‘एकच दादा, अजित दादा ‘ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी द्यायला सुरूवात केली.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ”जिथे पिकते तिथे विकत नाही. एकदा मी सोडून बारामतीवासीयांना दुसरा आमदार मिळाला पाहिजे. त्यानंतर तुम्ही नवीन आमदाराच्या आणि माझ्या कामाची तुलना करा. बारामतीवासीयांना न सांगता सर्व काही मिळत गेले. न सांगता चांगले रस्ते मिळाले. न सांगता पिण्याच्या योजना आली. न मागता मेडिकल कॉलेज मिळाले. सध्या बारामती शहर सोडून इतर मतदारसंघात ७५० कोटींची कामे सुरू आहेत.
राष्ट्रवादी भवन, कसबा-बारामती येथे जाहीर पक्ष प्रवेश https://t.co/RjLDLNmzYk
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 8, 2024
”इतकी विकासकामे करूनही बारामतीमध्ये हरलो. कामे करूनही पराभव झाला. आता बारामतीवासीयांना दुसरा आमदार मिळाला तर, माझ्या आणि त्याच्या कामाची तुलना करा. रोखठोक बोलणारा म्हणून माझी ओळख आहे. बारामती शहर किंवा गाव असो आपण त्या ठिकाणी विकास करत आहोत. विकासाच्या कामाला प्राधान्य कसे देता येईल हे आपण पाहिले पाहिजे. शेवटी निर्णय मीच घेतो. निर्णय घेताना काही लोकांचं मत जाणून घेतले तर फायदा होतो.
कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष चालतो हे मला माहिती आहे. कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा असतो. कार्यकर्त्यांनी काम केले नाहीतर गडबड होते हे मान्य केले पाहिजे.
दरम्यान राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. महायुतीमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यंदा बारामतीमधून निवडणूक लढणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे. आजच्या मेळाव्यातील भाषणामुळे अजित पवार कदाचित बारामतीमधून निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे पुत्र पार्थ किंवा जय पवार यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव हा अजित पवारांना जिव्हारी लागला आहे. विकास कामे करून देखील बारामतीत हरलो असे वक्तव्य त्यांनी आज केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चाना उधाण आले आहे.