
अमरावती : आपण पूर्ण ताकतीने मैदानात उतरलो तर यश आपल्यापासून दूर नाही. मग तो अमरावती जिल्हा असो की, वर्धा असो किंवा मग संपूर्ण महाराष्ट्र. महायुती राज्यातील सर्व जागा जिंकू शकते. त्यासाठी तुमच्या मनाचा निर्धार आणि जिंकण्याची उर्मी तुमच्यात पाहिजे, फक्त तुमच्या सारखे मावळे जर आमच्या सोबत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा तुमचं सरकार मी आणून दाखवेलच,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला. ते अमरावतीत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,“आपण जर पूर्ण ताकदीने मैदानात उतरलो तर महाराष्ट्रात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. काहीजण सत्तेत असताना पैसे कमावतात आणि सत्ता गेली की त्यांना गरीबांची आठवण होते. त्यांचे पोपट बोलायला लागतात. यांना सत्ता फक्त पैशासाठी पाहिजे असते, त्यामुळे आता फक्त मैदानात उतरायचे आहे.
गेली 60-70 वर्ष तुम्ही राज्यात सत्ता उपभोगली, त्यावेळी तुम्हाला शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, गरीबाची आठवण का झाली नाही, सत्तेत असताना तुम्हाला एससी, एसटी समाज का आठवला नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सत्तेवरून गेल्यानंतरच त्यांना गरीबांची आठवण का होते, पण सत्तेवर आल्यावर हेच लोक तोंड मिटून गप्प बसतात, अशा शब्दांत त्यांन विरोधकांवर निशाणा साधला.
याचवेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांच्या पराभवाबद्दलही भाष्य केले. “अमरावतीत नवनीत राणांच्या पराभवाचे दु:ख सर्वांना झाले. पण काही लोकांना फार आनंद झाला. राजकमल चौकात त्यांनी काय केले, हे आपण सर्वांनी पाहिले. अरे वेड्यांनो आता जागे झाला नाहीत आणि हे जर सहन करत राहिलात तर आपल्या आई-बहिणींना बाहेर फिरणं मुश्किल होईल”, असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी नमुद केले.