
Ambajogai Court News: अंबाजोगाई न्यायालयाचा मोठा निर्णय! जमीन खरेदी प्रकरणात मुंडेंना कोर्टाचा झटका
Ambajogai Court News: जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक केल्याच्या आरोपावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह तिघांविरुद्ध सुरू असलेला कायदेशीर लढा आता पुन्हा तीव्र झाला आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला दोषमुक्तीचा आदेश रद्द ठरवत, अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पुस व तळणी शिवारातील शेतकरी मुंजा किशनराव गित्ते यांची मौजे पूस शिवारातील गट नं. २८ मधील ३ हेक्टर १२ आर जमीन जगमित्र शुगर मिल्स या नियोजित कारखान्यासाठी २०११-१२ मध्ये खरेदी करण्यात आली होती. ही जमीन खरेदी करताना धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे यांनी फिर्यादीसह इतर साक्षीदारांना कारखान्यात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.
या याचिकेवर सुनावणी करताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. बी. भस्मे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला, फिर्यादीच्या कथनात तथ्य असल्याचे मान्य करत न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल बाजूला सारला आणि मूळ खटला पुनरुज्जीवित करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात मुजा गित्ते यांच्या वतीने अॅड. अनंत तिडके यांनी बाजू मांडली, त्यांना अॅड. व्ही. एन. कराड, अॅड. आर. एन. केकान, अॅड. आर.एन. घुले, अॅड. आर. आर. देशपांडे, अॅड.डी. एम. होळंबे, अॅड. एस. एम. केंद्रे, अॅड. एस. श्री, गायकवाड यांनी सहकार्य केले. या आदेशामुळे आता धनंजय मुंडे यांच्यासह इतर आरोपींना अपीलाची मुदत संपल्यानंतर पुन्हा न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.
हेही वाचा: Latur Election Result : लातुरमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; रविंद्र चव्हाणांना ‘ते’ वक्तव्य भोवणार
केवळ ५० लाख रुपयांत हा व्यवहार ठरला होता. उरलेल्या ५० लाख रुपयांपैकी केवळ १० लाख रुपये फिर्यादीला मिळाले. उर्वरित ४० लाख रुपयांचा धनादेश (क्र. १७९२७४) बँकेत अनादरित झाला. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे न मिळाल्याने मुंजा गित्ते यांनी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी तपास करून धनंजय मुंडे व इतरांविरुद्ध भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४१९, ३४ अन्वये दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्यानच्या काळात, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपींचा दोषमुक्तीचा अर्ज मंजूर केला होता. सरकारी पक्षाने या निर्णयाला आव्हान न दिल्याने, फिर्यादी मुंजा गित्ते यांनी अॅड. अनंत बा. तिडके यांच्यामार्फत अंबाजोगाई सत्र न्यायालयात पुनर्विलोकन याचिका (Revision Application) दाखल केली.