
कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर ! धाराशिवच्या 46046 शेतकऱ्यांना मोठा दिलासा
धाराशिव : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीत 46 हजार 46 थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्व पात्र शेतकऱ्यांनी दोन दिवसांच्या आत आधार प्रमाणीकरण करून ॲग्रीस्टॅक क्रमांक सादर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने केले आहे.
या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेले आणि १ एप्रिल २०१९ नंतर वितरित झालेले दोन लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीक कर्ज कर्जमुक्तीसाठी पात्र ठरणार आहे.
याशिवाय दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘वन टाईम सेटलमेंट’ (ओटीएस) योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार ३१ मार्च पूर्वी उर्वरित थकबाकी भरल्यास शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे.
महा-आयटीने विकसित केलेल्या संगणकीय पोर्टलवर बँकांनी थकीत पीक कर्जदारांची माहिती अपलोड केल्यानंतर २२ जुलै रोजी ५३३ शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २४ जुलै रोजी राज्यातील सुमारे १७ लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी आधार प्रमाणीकरणासाठी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील 46,046 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय पात्र शेतकरी
धाराशिव – 8,038
कळंब – 7,670
भूम – 6,248
तुळजापूर – 5,878
परांडा – 5,841
वाशी – 5,233
उमरगा – 5,025
लोहारा – 2,113
लाभ मिळविण्यासाठी काय करावे?
पात्र शेतकऱ्यांनी आधार कार्ड, यादीतील विशिष्ट क्रमांक आणि ॲग्रीस्टॅक क्रमांक घेऊन जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक क्रमांक उपलब्ध नाही, त्यांनी तो तत्काळ तयार करून घ्यावा. सेवा केंद्रावर कर्जाची माहिती, आधार क्रमांक व इतर तपशीलांची पडताळणी झाल्यानंतर प्रमाणीकरण पूर्ण होईल आणि प्रकरण कर्जमुक्तीच्या पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात येईल.
चुकीची माहिती असल्यास तक्रारीची सुविधा
माहितीमध्ये विसंगती आढळल्यास पोर्टलवरून ऑनलाइन तक्रार नोंदविता येणार आहे. ही तक्रार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे पाठविण्यात येईल. तक्रारीची पावती संबंधित शेतकऱ्याला दिली जाणार असून, तक्रार निकाली निघाल्यानंतरच लाभासाठी प्रकरण शासनाकडे पाठविले जाईल.
ज्या शेतकऱ्यांचे नाव दुसऱ्या यादीत आलेले नाही. मात्र, ते योजनेच्या निकषांनुसार पात्र आहेत, त्यांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा. अशा शेतकऱ्यांचा समावेश तिसऱ्या अथवा आवश्यकतेनुसार चौथ्या यादीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा उपनिबंधक पी. ए. साठे यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन दिवसांत आधार प्रमाणीकरण पूर्ण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्याचे आवाहन केले आहे.