गांधी जयंतीच्या दिवशी जर संघाची १०० वर्षे पूर्ण होत आहेत, तर नियतीचा हा स्पष्ट संदेश आहे की, तुम्ही तुमचे संघटन बरखास्त करा. हा संकेत आहे. अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघ आणि भाजपवर जहरी टीका केली. नागपूर येथील दीक्षाभूमीवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आणि हर्षवर्धवन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्याग्रह पदयात्रेला सुरूवात कऱण्यात आली. यावेळी त्यांनी आरएसएस ला त्यांच्या विचारसरणी आणि महात्मा गांधींच्या विचारधारेची आठवण करून देत, संघांवर निशाणा साधला.
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी संपूर्ण देशाला समाजवाद, सामाजिक न्याय, सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली. पण हिंसा आणि असत्य ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आहे. संघ आणि संघ परिवाराने देशाच्या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार असल्याचा अपप्रचार केला. पण द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणी मांडला होता, हे सर्वांना माहिती आहे. पण बदनामी मात्र महात्मा गांधींची करण्यात आली. आज तोच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महात्मा गांधींसमोर शरणागती पत्करली, हा संघाचा वैचारिक पराभव आहे,”अशी टीका सपकाळ यांनी केली.
“भाजपने खोटे बोलून सत्ता मिळवली. पण महात्मा गांधी नावाचा संत आजही भाजपच्या मानगुटीवर बसला आहे. संघाच्या १०० व्या वर्षी सुवर्णयोग आला आहे. त्यामुळे भारताचे संविधान व महात्मा गांधी यांचे विचार संघाने स्विकारावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी सपकाळ यांनी यावेळी केले.
‘भारताला मोठमोठ्या संतांची मांदियाळी लाभली आहे, हा महात्मा गांधींचा विचार होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक बुरसटलेला विचार स्पृश अस्पृश्यतेचा विचार आहे. या दोन बाजूंमध्ये आपण संविधानाच्या बाजूने उभे राहू या संकल्प करूयात. २ ऑक्टोबरला ही यात्रा सेवाग्रामला पोहचेल.’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्ष पूर्तीनिमित्त वर्षभर त्यांचे कार्यक्रम चालणार आहेत. आपल्यालाही स्वस्थ बसून चालणार नाही, आपल्यालाही वर्षभर एक सत्य लोकांसमोर सांगाव लागणार आहे. या लोकांचा काळा इतिहास हा जनतेसमोर मांडावा लागणार आहे. याची घोषणा आपण २ ऑक्टोबरला करणार आहोत.
राहूल गांधींना भाजपच्या एक प्रवक्त्याने धमकी दिली आहे.टिव्ही चॅनेलवर बोलताना त्याने, आपण राहुल गांधी यांच्या छातीवर गोळ्या झाडू अशी धमकी दिली आहे. महात्मा गांधींच्या छातीत गोळ्या घालणाऱ्यांच्या औलादी आजही वळवळ करत आहेत. पण राहुल गांधींना धमकी देणाऱ्यात हिंमत नाहीये. पण संघाच्या मुशीतून आलेला विचार त्या प्रवक्त्यापर्यंत गेला आहे. या निमित्ताने तुमच्यात हिंमत आहे का, त्यांच्या केसालाही तुम्ही हात लावू शकत नाही. असे आवाहन करतो.
आता अंधार फार झाला, बत्ती जपून ठेवा, आपल्या शेजारील तीन राष्ट्रे श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळमध्ये काय झालं ते पाहा, माझी संघाला विनंती आहे या देशाचा खेळखंडोबा करणारे तुम्ही, तुम्ही आणि फक्त तुम्हीच आहात, आता या अराजकतेच्या परिस्थितीवर आम्हाला आणून ठेवलं आहे. आमचा भारत खूप सुंदर आहे. आमच्य देशाचं वाटोळ करू नका, ही विनंती आहे.