पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील कान्होबा उर्फ तांबोळ देवस्थान येथे गुरुवारी दोन समाजांमध्ये आरती करण्याच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला. या धार्मिक स्थळी गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमध्ये पूजा विधी करण्यासंदर्भात मतभेद सुरू होते. गुरुवारी काही तरुणांनी मंदिराच्या गाभाऱ्यात आरती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यास इतर समाजातील काही तरुणांनी विरोध दर्शवला. यामुळे दोन्ही गटांमध्ये प्रथम शाब्दिक वादविवाद झाला आणि त्यानंतर त्याचे रूपांतर धक्काबुक्कीमध्ये झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली. डीवायएसपी सुनील पाटील, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, तसेच पाथर्डी पोलीस निरीक्षक विलास पुजारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने संयमाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला असला तरी संध्याकाळपर्यंत दोन्ही गट आपल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने वाद मिटवण्यात यश आले नाही.
डीवायएसपी पाटील यांनी पुढील दोन दिवसांत पाथर्डीत दोन्ही गटांची बैठक घेऊन सामोपचाराने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी उपस्थित नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. या बैठकीस सरपंच चारुदत्त वाघ, माजी सरपंच अमोल वाघ, अँड. वैभव आंधळे, अमोल गवळी, तुषार वाघ, विष्णू घाटूळ, रघुनाथ लांघे, विकास वाघ, हरिचंद्र आव्हाड, राजेंद्र वाघ, संतोष कासार, अँड. लतीफ शेख, शहाबुद्दीन शेख, मुस्ताक शेख, इसाक शेख, चांद सय्यद यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या कान्होबा देवस्थान परिसर आणि जवखेडे खालसा गावात तणावपूर्ण वातावरण असून, दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी तैनात आहे. पोलीस प्रशासन संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क आहे. प्रशासनाची मध्यस्थी आणि ग्रामस्थांचा संयम यावर या वादाचे निराकरण होणार आहे.