मुंबईत शिवसेनेचा उबाठा गटाला धक्का, तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश (फोटो सौजन्य-X)
मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन आज मुंबईतील उबाठा गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याशिवाय ठाणे तसेच गोवा राज्यातील उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. ठाण्यातील मातोश्री स्व. गंगुबाई संभाजी शिंदे सभागृहात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार दिलीप लांडे, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. या पक्ष प्रवेशाने शिवसेना वर्धापन दिनीच मुंबईत उबाठाला मोठा धक्का बसला आहे.
आज (19 जून) उबाठाचे विभागप्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी, शाखाप्रमुख संजय जंगम, प्रभाग क्रमांक १६१ चे उबाठा गटाचे माजी नगसेवक विजेंद्र शिंदे, प्रभाग क्रमांक १४० च्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेविका नादिया शेख आणि शिवसेना युवा सेना सचिव मोहसीन शेख यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच गोवा राज्यातील उबाठा गटाचे माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, काँग्रेस महासचिव काशिनाथ मयेकर, पाच तालुकाप्रमुख, एक शहर प्रमुख, विभागप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
ठाण्यातील रामचंद्रनगर शाखेचे उबाठाचे उपविभागप्रमुख मोहन चव्हाण, विजय काते, विजय पवार, महादेव कदम, प्रवीण बामणे आणि अनेक उपशाखाप्रमुख, गटप्रमुख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत सामील झालेल्या लोकप्रतिनिधींच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या प्रभागांतील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
“गेल्या साडेतीन वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अजेंडा घेऊन मी चांदीवली विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा संघटक म्हणून माझं काम करत आहे. मधल्या काळात काही संघटनात्मक बदल झाले. आम्ही वाईट काळामध्ये संघटनेसोबत ठामपणे काम करत होतो. वरिष्ठांच्या नेमणुका झाल्यानंतर त्यांनी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला. ते खूप मनाला लागले. जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरत होतो. आमचा रोष स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पदावर आल्या आल्या काही शाखाप्रमुखांना काढलं. मलाही बाजूला केलं हे आमच्या मनाला लागलं, असं माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.