महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ता अवघा जनसागर चैत्यभूमीवर येतो. याकरिता प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, या दिनानिमित्त मुंबई शहरामध्ये ड्राय डे ( मद्यविक्रीस बंदी) जाहीर करण्यात आला आहे. उद्या सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 6 डिसेंबर पूर्ण दिवस मद्यविक्रीस बंदी असणार आहे.
६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई शहर जिल्ह्यातील ठोक व किरकोळ देशी, विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या एफ विभागाचे निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि. ६ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत, असे आदेश मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहे. आदेशाची अंमलबजावणी न केल्यास अनुज्ञप्तीधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईल
या आदेशानुसार, राज्य उत्पादन शुल्कचे डी विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील एन.एम जोशी मार्ग व वरळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी सर्व अबकारी अनुज्ञप्त्या, ई विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील भोईवाडा व माटुंगा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ६ डिसेंबर २०२४ रोजी संपूर्ण दिवसभर बंद राहतील. संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई करतील त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या आदेशात नमूद आहे.
प्रशासनातर्फे सोयी सुविधांचे नियोजन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यांना आवश्यक त्या सोयी – सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार
महापरिनिर्वाण दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, बेस्ट, एसटी यांची परिवहन व्यवस्था, सीसीटीव्हीची व्यवस्था, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्था इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. चैत्यभूमी परिसरातील स्वच्छता, साफ- सफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी तसेच परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी तसेच पोलीस बंदोबस्त याबाबत नियोजन करावे अशा सूचनाही आयुक्तांकडून दिल्या गेल्या आहेत.
मुंबई महापालिकेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैद्यकीय चिकित्सा सुविधेमध्ये ३ कक्ष उभारण्यात येणार आहेत. यासोबतच आरोग्य आपत्कालिन व्यवस्थापनाकरिता तेथे ११ रूग्णवाहिका ही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच अनुयायांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे.