मुंबई: महायुती सरकारमधील नाराजीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संवाद साधून आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. निधीच्या वितरणाबाबत तसेच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदासंदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. अशा चर्चांच्या दरम्यान एकनाथ शिंदे अचानक दरेगाव येथे दाखल झाले आहेत. ते पुढील तीन दिवस तेथे थांबणार असून, त्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री अनपेक्षितपणे हेलिकॉप्टरने दरेगाव येथे पोहोचले. ते पुढील तीन दिवस तिथेच थांबणार आहेत. त्यांच्या या अचानक दौऱ्यामुळे, महायुतीतील सहकाऱ्यांबद्दल असलेल्या नाराजीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. यापूर्वीही विरोधकांनी असा आरोप केला होता की, नाराजी दर्शवण्यासाठी शिंदे दरेगाव गाठतात. मात्र, या दौऱ्यामागचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.
DC Vs RR: आयपीएलच्या १८ व्या हंगामात रंगला पहिल्या सुपरओव्हरचा थरार; दिल्लीचा ‘सुपरहिट’ विजय
एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य नाराजीवर आधारित राजकीय चर्चा सध्या रंगल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही मुद्द्यांवर मतभेद झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही असू शकतो. दरम्यान, शिंदे बुधवारी दरेगावात दाखल झाल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. मात्र, प्रसारमाध्यमांशी संवाद टाळत त्यांनी मौन बाळगले. त्यांच्या या दौऱ्यामुळे महायुतीतील अंतर्गत कुरबुरी आणि गटबाजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.