मंगळवेढ्यात वीजेच्या पोलवर काम करणार्या कंत्राटी लाईनमनचा शॉक लागून मृत्यू
मंगळवेढा : मंगळवेढा शहरातील दामाजी कारखाना चौकातील मायाक्का मंदिराजवळ कंत्राटी लाईनमन अतिश जयराम लांडे (वय 28) हा रविवार (दि.18) विद्युत खांबावर काम करत होता. नेमकं त्याचवेळी शॉक लागून वरुन खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, उपचार सुरु असताना बुधवारी (दि.21) सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर त्या कंत्राटी लाईनमनचा मृतदेह नातेवाईकांनी मंगळवेढा येथील वीज वितरण कार्यालयाच्या उंबर्याजवळ तब्बल तीन तास ठेवून या घटनेचा संताप व्यक्त केला.
रविवारी दुपारी दोन वाजता नागणेवाडी येथील मायाक्का मंदिर येथील विद्युत खांबावर कामानिमित्त अतिश लांडे हे चढले असता त्यांना विजेचा झटका लागला. त्यात ते खाली पडले होते. सोलापूरातील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. काम करत असताना अचानक विजेचा शॉक कसा काय बसला? हा एक चर्चेचा विषय बनला आहे. एका तरुणाचा अशाप्रकारे अंत झाल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे. यात जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई होणे ही तितकेच महत्वाचे आहे.
लांडे यांच्या नातेवाईकांनी सोलापूरहून थेट मृतदेह वीज वितरण कार्यालयाच्या उंबर्यात दुपारी दीड वाजता आणून ठेवला. यावेळी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला. ही घटना वार्यासारखी संपूर्ण जिल्हाभर पसरताच अधिकार्यांचे धाबे दणाणले व ते अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वीज वितरण कार्यालयात जवळपास एक हजार लोकांचा जनसमुदाय पाहून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली होती.
मनसेकडूनही घेतली गेली होती दखल
वीज वितरणचे जबाबदार अधिकारी मंगळवेढ्यात निवासी राहत नसल्यामुळे यावेळी उपस्थितांनी संताप केला. यापूर्वीही मनसेचे जिल्हा समन्वयक नारायण गोवे यांनी वीज वितरणला कुलूप लावण्याचा इशारा दिला असता अधिकार्यांनी आम्ही येथे राहणार म्हणून लेखी दिले होते. मात्र, याचे अद्यापही पालन झाले नसल्याचे दिसून येत आहे. बुधवारी दिवसभर वीज न जाता सुरळीत सेवा मिळाली. इतरवेळी मात्र दिवसभर अधून मधून वीज सेवा खंडीत होण्याचा प्रकार घडत असतो.