
'कारखाना हा खंडाळ्याचा स्वाभिमान, तो सर्वांनी जपूया'; खासदार नितीन पाटील यांची भावनिक साद
खंडाळा : खंडाळा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता सर्व गटांचे सभासद उपस्थित असून, ही सभा अत्यंत खेळीमेळीच्या व आनंददायी वातावरणात संपन्न होत असल्याचा आनंद होत आहे. खंडाळा कारखान्यासाठी उपस्थित ज्येष्ठ मंडळींनी योगदान दिलेले आहे. खंडाळा कारखाना अडचणीत असून, आपण सर्वांनी तो बाहेर काढण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. खंडाळा तालुक्यातील हा सहकारी साखर कारखाना आपल्या सर्वांचा स्वाभिमान आहे, तो आपण सर्वांनी मिळून जपला पाहिजे आणि तो आपण जपू या, अशी भावनिक साद सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील यांनी घातली.
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर बोलविण्यात आलेली होती. त्यावेळी ते बोलत होते. या सभेस ज्येष्ठ नेते व कारखान्याचे माजी चेअरमन शंकरराव गाढवे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बकाजीराव पाटील, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, किसन वीरचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, दत्तानाना ढमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती .
खासदार पाटील पुढे म्हणाले की, आव्हानात्मक परिस्थितीत किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने ताब्यात घेतले व मागील चार वर्षात विविध अडचणींचा सामना करत गळित हंगाम पार पाडले व इतर कारखान्यांबरोबर दर देण्यात यशस्वी ठरल्याचा आनंद आहे. मागील सिझनमध्ये ८८ दिवसामध्ये सरासरी २९०० मेट्रिक टनाने गाळप करून आतापर्यतच्या काळामध्ये सर्वाधिक गाळप करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. गळित हंगाम सन २०२६-२७ मध्येही अशाचप्रकारचे गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस असून, ४ लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहे.
कारखान्याच्या ३० किमी च्या अंतरावर ४ लाख टन ऊसाचे क्षेत्र आहे. नेतेमंडळींनी आपले राजकीय मतभेद बाजुला ठेऊन आपली सहकारी संस्था वाचविण्याच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वानी आपला पिकविलेला संपुर्ण ऊस कारखान्यास घालावा व हा कारखाना लवकरात लवकर कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्यादिवशी किसन वीर कारखान्याची सर्व देणी दिली जातील, त्यादिवशी हा कारखाना या संचालक मंडळाच्या स्वाधीन केला जाईल, अशी ग्वाहीही यावेळी खासदार नितीन पाटील यांनी दिली.
आम्ही संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण केलेले नाही व करणारही नाही, असे सांगून साखर धंद्यासाठी येणारा काळ हा अडचणीचा असुन शेतकरी ऊस पिकापासन परावृत्त होत आहे. तसेच कारखान्यांची गाळप क्षमता वाढल्याने कमी दिवसाचा गाळप हंगाम झालेला असून, ही बाब चिंताजनक असल्याचे सांगितले. सर्वांनी आपला व परिसरातील ऊस कारखान्यास घालून सहकार्य करावे व उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन खासदार नितीन पाटील यांनी यावेळी केले.
व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे म्हणाले की, नुकताच कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. शासनाने १५ ऑक्टोंबरपासुन कारखाने सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. कारखान्यातील सर्व कामे झालेली असुन कारखाना गाळपास सज्ज असल्याचे सांगितले. मागील हंगामात सर्वाधिक गाळप झाले, परंतु उद्दिष्ट गाठता आले नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावर्षीचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबद्ध असल्याचेही यावेळी राजेंद्र तांबे यांनी सांगितले. कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तम पाटील यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. सर्व विषयांना टाळ्याच्या गजरात मंजुरी घेण्यात आली. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संचालक डी. एम. भोसले यांनी मानले.
यावेळी कारखान्याचे संचालक चंद्रकांत ढमाळ, दत्तात्रय ढमाळ, अशोक गाढवे, रमेश धायगुडे, ज्ञानेश्वर भोसले, साहेबराव कदम, धनाजी अहिरेकर, किसन ननावरे, शिवाजी शेळके-पाटील, रत्नकांत भोसले, सुरेश रासकर, शालिनी पवार, किसन वीर कारखान्याचे संचालक रामदास गाढवे, संदिप चव्हाण, किरण काळोखे, प्रकाश धुरगूडे, कार्यकारी संचालक उत्तम पाटील, सचिव सागर गाढवे, दयानंद खंडागळे, किरण खंडागळे, सुधीर सोनावणे, महेश संकपाळ, संदिप गाढवे, सुधाकर खंडागळे, प्रविण गाढवे, शरद दोशी, महेश संकपाळ, प्रविण र. गाढवे, कारखान्याचे शेतकरी सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.